________________
क्रांतिगीता : संत तुकडोजी महाराजांच्या 'क्रांती-वीणा' रुपी काव्यसंग्रहाचा झंकार, सर्वत्र निनादत आहे. लोकांना, वाचकांना ही क्रांतिगीता' खूप आवडली. म्हणूनच ती घरोघर पोहोचली. संत तुकडोजींचे नाव सर्वतोमुखी झाले. 'क्रातिविणे'च्या माध्यमातून वंदनीय महाराजांनी दिलेला संदेश, अत्यंत बोलका असून, त्यात तुमच्या सुशुप्ता अवस्थेतील, मनालाही चेतना देण्याचे सामर्थ्य आहे. समाजातील सर्व घटकांना एका प्रातिनिधिक स्वरुपात त्यांनी हितोपदेश केलेला आहे. त्यामध्ये देशभक्त आहेत. भक्तगण आहेत. महिलापुरुष आहेत, श्रीमंत-धनिक आहेत. नवयुवक आहेत. अभ्यासू विद्वान आहेत. या सर्वांना तर त्यांनी जाणिव करून दिलीच आहे. पण परमेश्वरालाही साकडे घातलेले आहे. देवाचीही करुणा भाकली आहे. त्याच्या कृपेची अपेक्षा केली आहे. 'देवा तुला आमची कीव कशी येत नाही?' अशी खंत व्यक्त केली आहे. ही तुकडोजींची रक्तरंजित क्रांती नाही. त्यात घातपात, रक्तपात, मारामारी किंवा ॲटम बॉम्ब नसून त्यात प्रकाशकांनी म्हटल्याप्रमाणे त्याग, सेवा, सत्य, प्रेम आणि अहिंसा ही क्रांतीची शाश्वत मूल्ये प्रतिपादन केलेली आहेत. संत तुकडोजी महाराजांची, ही 'क्रांतिविणा' म्हणजे क्रांतीची पेटती, जागती मशाल झाली आहे. या क्रांती-वीणेच्या मंजुळ सुस्वराने, नादब्रह्माने आपले संसार सुखाचे व्हावेत आणि प्रत्येकाने या सामाजिक अहिंसक, क्रांतीचे अग्रदूत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (५५)