अलिकडे वर्तमानपत्रांतून श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीची व ज्या शिवलिंगाची महाराज नित्यपुजा करीत असत, त्याची अव्यवस्था झाल्याविषयी वारंवार लेख येत असत, ते वाचून मनास अतिशय दुःख होई की, ज्या महापुरुषानें आह्मां हिदूंकरितां अनेक श्रम केले. अनेक संकटें भोगिलीं. आणि स्वराज्य स्थापन केलें. त्या परम प्रतापी शिवाजी महाराजांचे समाधीची ही अशी दशा ऐकून आम्ही स्वस्थ बसावेना ! धिक् आमचें जिणें. असे वारंवार वाटे. शेवटी असे योजलें की, आपण एकवार रायगडावर जाऊन डोळ्यांनी तेथील सर्व स्थिति पाहून यावी, आणि नंतर त्या संबंधानें हकीगतीचें लहानसें पुस्तक लिहून, राजेरजवाडे व पुढारी मंडळी यांजकडे पाठवावें. असे मनांत आणून तारिख ३० माहे मार्च सन १८८५ रोजी वडोदें सोडून तारीख ३ माहे एप्रील सन १८८५ रोजी रायगडावर दाखल झालों. नंतर तेथें जें कांही मी पाहिले व रायगड संबंधाने ज्या कितीएक दंतकथा समजल्या व जुन्या पुस्तकांतून माहिती मिळाली ती यांत लिहून हे लहानसें पुस्तक तुझां सर्वांपुढे ठेविलें आहें.
| बडोदे | आपला अतिनम्र सेवक
| |
| ता. १ जून | गोविंदराव बाबाजी जोशी.
| |
| सन १८८५ | वसईकर. | |
|