पान:युगान्त (Yugant).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२ / युगान्त

लागते, अगदी निराळाच अर्थ प्राप्त होतो. धर्म हा विदुराचा औरस व पांडूचा क्षेत्रज मुलगा असेल, तर भारतीय युद्ध हे फक्त दोघा भावांच्या मुलांचे युद्ध न राहता तिन्ही भावांच्या मुलांतील युद्ध होते. पण तिहेरी लढाई होत नाही, याचे कारण एकजण दोघांचा मुलगा म्हणून! आपल्या क्षेत्रज मुलांचे बाप कोण, हे कोणासही कळू नये, म्हणून पांडू लांब हिमालयात गेला. त्याच्या मुलांचे बाप कोण, हे कोणाला कळले नाही. व्यासाप्रमाणे पितृत्व कधी उघड झाले नाही. विदुर मुलासाठी म्हणून कसल्याही कारस्थानात पडला नाही. शेवटपर्यंत तो उदासीन व अलिप्तच राहिला. मुलगा राजा झाल्यावरही राजाचा बाप म्हणून धृतराष्ट्राप्रमाणे त्याला मिरवता आले नाही. विदुराची खिन्नता धर्माच्याही वाट्याला आली. जे हक्काचे, ते सर्व मिळाले. पण इतक्या हानीने की सर्व मिळूनही धर्म शेवटपर्यंत नुसता उदासीनच नव्हे, तर अकृतार्थही राहिला.

 ऑक्टोबर, १९६५