पान:युगान्त (Yugant).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ / युगान्त

एकाएकी गांधाराची आठवण झाली आणि अगदी नकळत सुस्कारा बाहेर आला. दुसरे काऽऽही नाही." गांधारीच्या शब्दांनी तिला डिवचण्याचा हेतू नाहीसा होऊन धृतराष्ट्र कळवळून म्हणाला, "खरंच गांधारी, आंधळ्याशी जखडून तुझी दुर्दशा झाली नाही ? माहेरच्या आठवणींनी तू पोळत असशील, नाही का?" गांधारी म्हणाली, "मुळीच नाही, माहेरच्यांची आठवण ज्या दिवशी आपल्याशी लग्न झाले त्याच दिवशी बुजवलेली आहे. आज आठवण झाली, ती गांधाराच्या प्रदेशाची, माणसांची नव्हे. आपल्याला माहीतच आहे, महाराज, की राजवाड्याच्या एका प्रांगणांत राहूनही मी माझ्या भावाशी कधी बोलले नाही." थोडा वेळ स्तब्धतेत गेला. विदुराच्या व कुंतीच्याही तोंडावर आश्चर्य उमटलेले होते. नवरा-बायकोचे हे भाषण कोणत्या थराला जाणार, अशीच चिंता कुंतीला लागल्यासारखी दिसत होती. आता धृतराष्ट्राची बोलायची पाळी होती. त्याच्या आवाजातला पहिला उपहास गेला होता. थोड्याशा अजिजीच्या स्वराने तो म्हणाला, "तुला फसवून, माझ्या आंधळेपणाची वार्ता न देता इकडे आणून तुझी माझ्याशी गाठ घातली. तुझ्या माहेरच्यांनी व आम्ही तुझे कोटि-कोटी अपराध केले. पण गांधारी, तूही त्याचा कोटि-कोटी बदला घेतलास. अजूनसुद्धा झाल्या-गेल्याची क्षमा करणे शक्य नाही का ?"
 अशा तऱ्हेचे संभाषण तिसऱ्याने न ऐकणे बरे, असे वाटून विदुर व कुंती मुकाट्याने उठून जाऊ लागली. पण डोळस माणसांच्या डोळ्याला जे दिसणार नाही, ते आंधळ्या धृतराष्ट्राच्या कानाला ऐकू येत होते. विदुर व कुंती यांच्या बाजूला डोके वळवून धृतराष्ट्र म्हणाला, "थांबा, कोठेही जाऊ नका. इथेच बसा. आम्हां नवरा-बायकोच्या संबंधात, एकांतात अशी एकही गोष्टी झाली नाही, यापुढेही होण्याचे कारण नाही. मी वडीलकीच्या नात्याने सांगतो, बसून रहा, जाऊ नका." आपली आज्ञा ऐकून ती दोघेजण बसली ना, एवढे ऐकण्यापुरते तो थांबला, व मग गांधारीकडे वळून