पान:युगान्त (Yugant).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१० / युगान्त

पितृप्रधान कुटुंबात पुरुषाचे वर्चस्व असे. बायकांना- विशेषतः सासुरवाशिणींना- काही हक्क नसत. म्हणून अशांबद्दल मनूने आवर्जून सांगितले आहे, "ज्या कुळात वधूंना (सासुरवाशिणींना) अश्रू गाळावे लागतात, जेथे त्यांचा तळतळाट होतो, त्या कुलाचा नाश होतो. ह्याच्या उलट बायकांना जेथे सन्मानाने वागविले जाते ( पूज्यन्ते) त्या घरी देवता वास करतात- 'देव तेथेचि जाणावा.' " कुरुकुलाने बायकांची भयंकर विटंबना केली. त्यांची शरीरे व मने दोन्ही चुरगळून टाकली. ते कुल नाशालाच योग्य झाले होते. आणि दुर्दैव असे की, हे सर्व पाप भीष्माच्या हातून झाले होते.
 आणखी एक प्रश्न उद्भवतो. भीष्माने स्वतःसाठी काही केले नाही. ज्या दिवशी त्याने राज्याचा व स्त्री-संगाचा त्याग केला, त्या दिवशी त्याचे स्वतःचे असे कर्तव्यच राहिलेले नव्हते. त्याने जे केले, ते इतरांसाठी. त्या कृत्यांबद्दल त्याला जबाबदार धरता येईल का? हाच प्रश्न दुसऱ्या तऱ्हेने विचारता येईल. मानवी जीवन संपूर्णतया निरागसपणे घालवता येईल का ? जगायचे ठरवले की, मनात असो वा नसो, हातून पाप घडणारच, अशी तर मानवी जीवनाची घडण नाही ? अंबा ही शाल्वाची, हे माहीत असता तिला रथातून का आणले ? भावाच्या बायका विधवा झालेल्या. स्वतःची शपथ तर पाळायची. पण त्यांच्यासाठी कुरूच्या घराण्यात तरुण पुरुषांची वाण पडली नव्हती. महाभारत स्पष्ट म्हणते की, राणीच्या मनात भीष्म व इतर कुरुपुंगव उभे राहिले. सर्वांना डावलून एक रानटी ब्राह्मणच का सापडला? ह्याला उत्तर असे संभवते की, राजसभेतील एखादा योद्धा निवडला असता, तर मुलांचा बाप म्हणून त्याला कायमचे स्थान मिळाले असते. त्यापेक्षा ज्याचा पुढे राजघराण्याशी संबंध येण्याचा संभव नाही असाच पुरुष बरा,