पान:युगान्त (Yugant).pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युगान्त /२२९ . महाभारतामध्ये मैत्री म्हणजे काय, ह्याचे त्या वेळच्या चालीरीतींना धरून उत्तम चित्रण झाले आहे. दारिद्याने गांजलेला द्रोण द्रुपदाच्या राजदरबारी येऊन आपण द्रुपदाचे बालमित्र, म्हणजे आताचेही मित्र असे नाते सांगू लागला. द्रुपदाने हे मित्रत्व झिडकारले. 'राजा दरिद्री ब्राह्मणाचा मित्र कसा होऊ शकेल? मैत्री ही बरोबरीच्यांत असते, इतरांत नाही,' असे त्याने द्रोणाला बजावले. द्रोणाने शिष्यांकरवी द्रुपदाचे अर्धे राज्य हिरावून घेऊन, 'आता आपण बरोबरीचे मित्र झालो,' असे म्हणून द्रुपदाला जीवदान दिले. ही गोष्ट मैत्रीची सुरवात नसून एका भयंकर वैराचीच सुरवात ठरली. कर्णाचा शस्त्ररंगात अपमान झाल्यावर दुर्योधनाने कर्णाला आपला मित्र म्हणवले व अंगाचे राज्य दिले. राजे-राजे म्हणून बरोबरीचे मित्र म्हणावे तर तशी परिस्थिती नव्हती. एक क्षत्रिय होता, दुसरा लौकिकात सूत होता, व शेवटपर्यंत दुर्योधन-कर्णांचे नाते बरोबरीच्या मित्रांचे न होता पोष्यपोषकांचेच राहिले. कर्णपर्वात शल्याचे शब्द हेच दाखवतात. अर्जुनाचा रथ कर्णाला दाखवून शल्य म्हणाला, 'कर्णा, दुर्योधनाने तुझ्यावर भार टाकला आहे. (८.६२.१३-१४) तो उचल. आता वेळ आली आहे.' अशाच त-हेचे उद्गार भीष्माचेही होते. म्हणजे लौकिकात कर्ण दुर्योधनांचे संबंध बरोबरीच्या मित्रांचे नव्हतेच. तिसरे उदाहरण कृष्णार्जुनांच्या मैत्रीचे आहे. ते मात्र अगदी बरोबरीच्या मैत्रीचे आहे. दोघांचा सामाजिक दर्जा क्षत्रियाचा; दोघेही धाकटे मुलगे म्हणून अभिषिक्त राजे नव्हते; दोघांनीही पराक्रमाने एकमेकांना मदत केलेली; घराण्यांत विवाहसंबंध झालेले; एकत्र बसून 'विक्रान्तानि रतानि च,' अशा युद्धे व प्रेम ह्यांबद्दल मनसोक्त गप्पा मारलेल्या; दोघांनी बरोबर बसून दारू प्यालेली; ह्याच अवस्थेत एकाच्या बायकोचे पाय दुसऱ्याच्या मांडीवर अशा त-हेने वागलेले; एक दुसऱ्याशिवाय जगू शकत नव्हता. महाभारत-