पान:युगान्त (Yugant).pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युगान्त/२२७ तरी इतर मूल्ये ज्या त-हेने मनुष्य जन्माला आला, त्यावर अवलंबून होती. कोणी क्षत्रिय होता, कोणी ब्राह्मण होता. कोणी मुलगी होती, कोणी आई होती, कोणी मुलगा होता- आणि जो-तो आपल्या जन्मामुळे प्राप्त झालेली कर्तव्य सांभाळून त्या स्थानाला चिकटलेल्या मूल्यांचे संरक्षण करीत होता. ह्या मूल्यांना धरून वागल्यामुळे जे कल्याण व्हावयाचे ते जगात न दिसणारे, मानवी हातांनी न गवसणारे असे होते. अगदी उलट परिस्थिती ह्यापुढच्या कालखंडात दिसते. सत्याच्या, शौर्याच्या, सतीत्वाच्या, भक्तीच्या कल्पना पराकोटीला गेलेल्या. त्यांचे वर्णन वास्तव नाहीच आणि ते सर्व गुणही खोटेच. कारण ह्या कल्पनेप्रमाणे वागणाऱ्या माणसाला सर्व सुखे प्राप्त होतात. दुःखे क्षणभंगुर ठरतात. मनुष्य अमक्या त-हेने वागतो, ते मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने वागतो की बक्षिसाच्या लालचीमुळे तेच कळत नाही. कथा, नाटक, काव्य सगळ्यांवर ह्या वृत्तीचा पगडा बसलेला; म्हणून ज्या मूल्यांचा पुरस्कार केलेला, ती मुळातच आभासात्मक, पोकळ, असत्य वाटू लागतात. त्याप्रमाणे वागण्याचा नुसता देखावा उभा केलेला असतो. हरिश्चंद्र सर्वस्व देतो व सर्व पूर्वीच्या कितीतरी पट जास्त मिळते; उत्तररामचरितात रामाने मारलेला शंबूक दिव्य रूपाने परत येतो; सीतेचे धरणीच्या पोटात जाणेसुद्धा खोटे- खोटेच ठरते; चांगुणा मूल ठेचते, तेही परत मिळते. सर्व काही सत्त्वपरीक्षेच्या सदरात जाते व परीक्षेत उत्तम मार्क मिळाले की प्रसिद्धी होते, मान मिळतो, जे काय घालवले असेल, दसपट मिळते. ह्या किमयेत मानवी जीवनाच्या कष्टदायक मर्यादा नाहीतशा होऊन एक स्वप्नसृष्टी निर्माण होते. नायक-नायिकांवर अपरंपार संकटे कोसळायची व त्यातून त्यांनी पार होऊन जायचे, हा संकेत काव्यांत, नाटकांत सर्वत्र रूढ झाला. महाभारतानंतर हे युग सुरू झाले ते आजतागायत टिकले आहे. . त्याच्या