पान:युगान्त (Yugant).pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८/युगान्त पुरुष त्यात जन्मलेले असत. (दत्तक गेलेल्यांचा, घेतलेल्यांचा अपवाद.) कुटुंबात जन्मलेल्या मुली परघरी जात व परघरच्या मुली सासवा, बायका व सुना म्हणून कुटुंबात येत. कुटुंबात जन्मलेल्या मुली कन्या व पुत्री असत. त्यांचे निराळे असे अंतःपुर होतेसे दिसते. परघरच्या मुलींना 'वधू' हे सामान्य नाव. त्यांचे अंतःपुर निराळे असे. ह्या काळचा विशेष असा की, नातेवाचक शब्द फारच कमी होते. 'पिता', 'तात' ह्या शब्दांनी बाप, बापाचे भाऊ ह्यांचा बोध होई. बापाची बायको व बापाच्या भावाची बायको ही 'माता' किंवा 'अम्बा' होती. स्वतःच्या बापाची व बापाच्या भावाची मुले, पुत्र व कन्या असत. महाभारत ही भावा-भावांच्या मुलांच्या भांडणाची गोष्ट आहे. पण बाप व चुलता, सख्खा भाऊ, चुलतभाऊ, मुलगे व पुतण्ये असे निरनिराळे शब्द नाहीत. ही गोष्ट परत-परत लक्षात येते. वारणावताला जाताना धर्म धृतराष्ट्राचा व गांधारीचा 'तात' व 'अम्ब' म्हणून निरोप घेतो. ही माणसे आपला घात करणार आहेत, हे माहीत असूनही त्यांना नमस्कार करून दीनपणे उभा राहतो. त्यावेळची 'तात' व 'अम्ब' ही संबोधने आजच्या वाचकाला तरी जास्तच करुण वाटतात. 'पुत्र' म्हणून पांडवांना त्यांनी दिलेला आशीर्वाद जास्तच दांभिक वाटतो. पांडवांना वनात पाठविले, तेव्हा विदुर त्यांच्या वतीने धृतराष्ट्राशी भांडला, तेव्हाही धृतराष्ट्राने विदुराला म्हटले, "अरे! एवढा कळवळा आला असला, तर जा त्यांच्यामागून. माझ्यामागे भुणभूण लावू नकोस." ३.५.१७. कथं हि पुत्रं पाण्डवार्थे त्यजेयम् ('पांडवांसाठी मी मुलाचा त्याग करणे कसे शक्य आहे?') असंशयं तेऽपि ममैव पुत्रा दुर्योधनस्तु मम देहात् प्रसूतः। स्वं वै देहं परहेतोस्त्यजेति को नु ब्रूयात् समतामन्यवेक्षन्।