पान:युगान्त (Yugant).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १७५


करावयाचा, ह्या गोष्टीत युक्ती तर होतीच, पण त्याहीपेक्षा मोठे धाडस होते. जरासंधाच्या सैन्याशी सामोरे उभे राहून युद्ध करणे शक्य नव्हते. त्या सैन्यापुढे पळताना यादवांना भुई थोडी झाली होती. जरासंध स्वतःही निष्णात आणि बलशाली योद्धा होता. पण त्याच्याशी एकट्याशी लढाई करणे शक्य होते. भीमाच्या शक्तीवर व मल्लयुद्धनिपुणतेवर कृष्णाचा विश्वास होता. तितकाच अर्जुनाच्या व स्वतःच्या शस्त्रविद्येवर होता; तरीही इतक्या लांब जाऊन समोरासमोर युद्ध करण्याची मागणी करणे हे मोठ्या धाडसाचे काम होते, यात शंकाच नाही. लढाई करताना 'जरासंध दमला आहे; आता त्याला उसंत मिळू देऊ नकोस,' असा त्याने भीमाला इशारा दिला, यातही काही खोटेपणा नव्हता. भीम निश्चितच जरासंधापेक्षा बलवान होता आणि त्याने सरळ लढाईत जरासंधाला मारले. लढाईला उभे राहण्याआधी 'कैदेतील राजांना सोड, ' म्हणून कृष्णाने जरासंधाजवळ मागणी केली होती. 'ती झिडकारलीस तर आमच्यापैकी कोणाशीही युद्ध कर,' अशी दुसरी मागणी होती. झालेला व्यवहार सरळ होता. तसेच रुक्मिणीला पळवून नेले, हेही सर्वस्वी त्या वेळच्या राजनीतीला धरून होते. भीष्माने काशिराजाच्या मुली स्वयंवर मंडपामधून पळवून आणल्या होत्या. रुक्मिणी काही शिशुपालाची वाग्दत्त वधू नव्हती. तिच्या भावाच्या मनात काहीही असले, तरी एकदा स्वयंवर मांडल्यावर मुलीला पळवून नेणे हे शक्य असल्यास तसे करणे हे क्षत्रियनीतीला धरून होते. शिशुपालाचा तिसरा आक्षेप होता, 'कृष्ण राजा नाही,' हा ! तोही फोलच होता. अर्जुनाने द्रौपदीला जिंकले, तेव्हा तो काही राजा नव्हता, एवढेच नव्हे तर थोरला भाऊ जिवंत असल्यामुळे राजा होण्याची शक्यताही नव्हती. राजा नाही, म्हणून कृष्णाला हिणवणारा शिशुपाल याच तोंडाने 'भीष्माला अग्रपूजा द्या,' म्हणत होता. भीष्मही राजा नव्हता. शिशुपाल कृष्णाचा प्रतिस्पर्धी होता; जरासंधाच्या प्रमुख सेनापतींपैकी होता. प्रत्येक बाबतीत कृष्णाने