पान:युगान्त (Yugant).pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२ / युगान्त


राज्यात रहायची परवानगी दिली. शिशुपालाला मारले तेव्हा शिशुपालाचा मुलगा गादीवर बसला, भारतीय युद्ध झाल्यावर धर्मराज हस्तिनापुराच्या गादीवर बसला. तेव्हा व्यासाने धर्माला जे पहिले कर्तव्य सांगितले ते असे... “जे-जे राजे युद्धात मारले गेले, त्या सर्वांच्या राजधानीमध्ये दूत पाठवून राण्यांचे सांत्वन कर, त्यांना अभय दे ! मृत राजाचा जो कोणी मुलगा असेल, त्याला अभिषेक कर व त्याचे रक्षण करण्याची काळजी घे! एखादी राणी गर्भवती असेल व दुसरा वंश नसेल, तर चांगले लोक नेमून तिचे रक्षण कर व तिला मूल झाले म्हणजे त्याच्या नावाने द्वाही फिरव " ( शांतिपर्व : अध्याय ३४ : श्लोक ३१-३३ ) ह्या सर्व उदाहरणांवरून असे दिसून येते की, त्या वेळी युद्धाचे काही विशिष्ट नियम असत. क्षत्रियांनी एकमेकांची राज्ये हिसकावणे हे त्या वेळच्या रीतीला धरून नव्हते. धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाचा पांडवांशी जो विचारविनिमय झाला, त्यातही हीच गोष्ट दिसून येते. कोठचे राजे जिंकण्याला सोपे, आपले आप्त म्हणून कोणाकडून साहाय्य मिळेल, कोणाला मारले पाहिजे, हा तो विचार होता. प्रत्यक्ष चार भाऊ दिग्विजयाला गेले, तेव्हाही राजांचा पराभव करूंन,

त्यांच्याकडून करभार घेऊन आणि त्यांना यज्ञाचे निमंत्रण देऊन ते आले. शिशुपाल धर्माला अग्रपूजेच्या वेळेला हेच बजावतो. “तू जो राजसूय यज्ञ करतो आहेस, तो आम्ही सर्वांनी तुला मान्य केले म्हणून." हा त्याच्या म्हणण्याचा मथितार्थ होता. कृष्णाने
जरासंधाबद्दल व जरासंधाशी भाषण करताना हेच सांगितले, " राजे लोकांना पकडून आणून ठेवले आहेस व त्यांना बळी देणार आहेस, हे कृत्य राजनीतीच्या विरुद्ध आहे. त्यांना सोडून दे, म्हणजे आमचे काही म्हणणे नाही.” ह्या म्हणण्याला जरासंध कबूल होईना म्हणून त्याला मारावे लागले. राजसूय ज्याने करावयाचा तो राजा नुसता वीर्यशालीच नव्हे, तर धर्मज्ञही असावा, अशी त्या वेळची कल्पना होती. कृष्णाने धर्माला हेच सांगितले. “तू सम्राट म्हणून सगळ्यांना१६२ / युगान्त