पान:युगान्त (Yugant).pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६ / युगान्त


कोणी प्रतिकूल, कोण जिंकायला सोपे वगैरे सांगून मगधाधिपती जरासंधाचा वध केल्याशिवाय राजसूय यज्ञ करणे शक्य नाही, हे धर्माला पटवून दिले. जरासंधाबद्दल बोलत असताना कृष्णाच्या पूर्वायुष्याचा ओझरता उल्लेख व यादवांचे मथुरेहून द्वारकेला जाणे ह्या दोन गोष्टी कृष्णाने स्वतःच्या शब्दांनी सांगितलेल्या आहेत.
 महाभारतामध्ये ज्या कृष्णाचे दर्शन घडते, तो कृष्ण हरिवंशामधील कृष्णापेक्षा किंवा भागवतामधील कृष्णापेक्षा अगदी निराळा आहे. महाभारतामध्ये कृष्ण येतो तो मोठेपणी, द्वारकेत राहणारा असा येतो. त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी त्याच्या स्वतःच्या तोंडून कळतात. त्याने व बलरामाने कंसाला व सुनाम्याला मारले. कंसाच्या राण्या ह्या जरासंधाच्या मुली होत्या. त्यांनी आपल्या बापामागे कंसवधाचा सूड घेण्याचे टुमणे लावले व जरासंध यादवांवर चाल करून गेला. जरासंधापुढे यादवांचा टिकाव लागेना म्हणून यमुनाकाठचा प्रदेश सोडून यादव पश्चिमेकडे पळाले आणि रैवतक पर्वताच्या भोवती 'कुशस्थली' नावाच्या ठिकाणी राहिले व तेथे द्वारका नावाची कोणाही शत्रूला घेता येणे शक्य नाही, अशी एक नगरी त्यांनी बांधली. ही नवी नगरी व तिच्या भोवतालचा प्रदेश येथे वृष्णी, अंधक, भोज वगैरे यादवांची निरनिराळी कुळे बलरामाच्या अधिपत्याखाली राहिली. कृष्णाचा बाप वसुदेव ह्याला बऱ्याच बायका होत्या. बलराम हा रोहिणीचा मुलगा. सुभद्रा व सारण ही सख्खी भावंडे वसुदेवाच्या आणखी एका राणीची मुले. म्हणजे बलराम, श्रीकृष्ण व सुभद्रा ही एकमेकांची सावत्र भावंडे होती. कृष्णाने आपल्या शौर्याने व शहाणपणाने यादवांचे स्वातंत्र्य कायम राखले होते. ह्या यादवांच्या निरनिराळ्या शाखांचे वर्णनही महाभारतात काही ठिकाणी येते. सभापर्वात मोठमोठ्या यादव- वीरांची नावेदेखील सांगितलेली आहेत. पण महाभारतात ठिकठिकाणी विखुरलेली माहिती गोळा करूनही यादव वंशाचा संगतवार इतिहास सांगता येत नाही.