पान:युगान्त (Yugant).pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४ / युगान्त


नाही, असे दिसते. ही वागणूक कुंतीने कदाचित जाणून-बुजून ठेवली असेल. गांधारीचा भाऊ तिच्या लग्नाच्या दिवसापासूनच कौरवांच्या दरबारात ठाण मांडून प्रतिष्ठित झाला होता. कुंती आणि माद्री ह्यांच्याबरोबर कुणी माहेरची माणसे आली नव्हती. जरी काही आली असली, तरी लौकिकाप्रमाणे लग्नसोहळा आटोपल्यावर परत गेली असणार. नवऱ्याच्या मागे माहेरच्या कोणाला हक्काने बोलावणे शक्य नव्हते. ती स्वतःच इतकी दीन होती की, तिच्या माहेरच्या माणसांना कौरवांच्या दरबारी स्थान मिळणे शक्यच नव्हते. फार तर तिला व तिच्या मुलांना तिच्या माहेरी आसरा मिळाला असता; पण त्यामुळे हस्तिनापुराच्या राज्यावरील तिच्या मुलांचा हक्क कदाचित कायमचा नाहीसा झाला असता. वडिलोपार्जित संपत्तीवरील मुलांचा हक्क नाहीसा होऊ नये, म्हणून ज्या शहाणपणाने व खालच्या मानेने विधवा भावजय थोरल्या दिराच्या कुटुंबात राहते, अगदी त्याचप्रमाणे कुंती राहिलेली होती. आणि ह्यामुळेच कदाचित यादवांचे नाव द्रौपदीस्वयंवरापर्यंत महाभारतात ऐकू येत नाही. पांडव लहान असल्यापासून द्रौपदी-स्वयंवरापर्यंतचा काळ यादवांना फार धकाधकीचा गेला असणार. कंसवध, जरासंधाशी युद्ध व त्याला भिऊन यमुनाकाठचा प्रदेश सोडून दक्षिणेकडे जाणे, द्वारका स्थापणे व तेथे स्थिरस्थावर होणे ह्या सर्व घटना याच काळातल्या असणार.

 स्वयंवर मंडपात यादवांची मंडळी आली होती, पण ती द्रौपदी मिळवायला नव्हे. एकंदर समारंभ बघून स्वयंवरात काय होते, हे बघण्यापुरतेच ते आलेले दिसतात. अर्जुनाने पण जिंकल्याबरोबर कृष्णाची नजर ब्राह्मणवेषाने बसलेल्या पाच पांडवांकडे गेली, त्याने शेजारी बसलेल्या बलरामाला नाव घेऊन कुठचा कोण, हे सांगितले. सांगता सांगता तो असेही म्हणतो, "माझ्या गुप्त हेरांनी अशी वार्ता आणली होती की, पांडव वारणावताला जळत्या घरात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले नाहीत; ते निसटून गेले असावेत, असा कयास आहे; तेच हे दिसताहेत.” त्याने व बलरामाने लवाजमा