पान:युगान्त (Yugant).pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६ / युगान्त


नव्हती, त्याबद्दल धर्माला तो काही वचन देऊ शकेल, हे अशक्यच वाटते.

 तसेच तेजोभंगाचे प्रकरणही पटत नाही. एका बाजूला अर्जुन व एका बाजूला कर्ण अशा दोन मुख्य व्यक्ती ह्या पर्वात आहेत. अर्जुन दररोज (एक दोन दिवस वगळल्यास) संशप्तकांशी लढत होता. ह्याही दिवशी अर्धा दिवस लढल्यावर तो मुख्य सैन्यात परत आला. धर्म कुठे दिसेना, म्हणून त्याने भीमाला विचारले, “राजा कुठे आहे ?" भीम म्हणाला, “काय की, मला नक्की माहीत नाही. फार जखमी होऊन तो शिबिरात गेला आहे. मेला आहे की जिवंत आहे, मला सांगता येणार नाही." भीम महाभयंकर लढाईत गुंतला होता. त्याला राजाचे काय झाले हे खरोखर ठाऊक नव्हते, की तो अर्जुनाला चेव आणायला असे बोलला, ते कळत नाही. अर्जुन ताबडतोब शिबिरात गेला. “कर्णाला मारून आलास ना? शाबास!" ह्या शब्दांनी धर्माने त्याचे स्वागत केले. “तुझी विचारपूस करायला आलो.” हे अर्जुनाचे शब्द ऐकल्यावर धर्म भडकला व अर्जुनाला इतके टाकून बोलला की, अर्जुन संतापाने भावाला मारायला उठला. शेवटी कृष्णाने हा सर्व प्रकार हसण्यावारी नेऊन भावा-भावांत दिलजमाई करून दिली व " आता चल. कर्णावर तुटून पडू,म्हणून त्याने रथ हाकला. हा प्रकार तेजोभंगाचा की चेव आणण्याचा ? शल्याचे कर्णाशी बोलणेही ह्या प्रकारचेच होते. शल्य मोठ्या मिनवतारीने कर्णाचा सारथी झाला. "मी मूर्धाभिषिक्त राजा कर्णाचा सारथी होणार की काय?" ह्या शल्याच्या वाक्याने कर्णाला अंगराजपदाचा अभिषेक झाला होता की नाही, अशी शंका मनात परत डोकावते. शल्य सारथी झाल्यावर अर्जुनाप्रमाणे रथाला पांढरे घोडे जोडून जयघोष करीत कर्ण निघाला. बरोबर शस्त्रांनी व बाणांनी भरलेला दुसरा रथ होता. “अर्जुन कोठे आहे ते मला दाखवा, आत्ता त्याला ठार करतो. कोठे दिसत नाही कसा? कोणी पाहिला आहे का त्याला? कुठे गेला आहे तो ?” अशा आरोळ्या