पान:युगान्त (Yugant).pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १३५


दुर्योधन तेथे असल्यामुळे कदाचित आपण दुर्योधनाचे प्रतिस्पर्धी होऊ नये, म्हणून त्याने जिंकण्याचा विचारही केला नसेल. काही का असेना, दुसऱ्या कोणालाही जे करता आले नाही ते अर्जुनाने केले, व लढाईतही त्याने कर्णाला हात दाखवला. ह्याप्रसंगी अर्जुन ब्राह्मणवेषात होता. अर्जुन ब्राह्मण म्हणून कर्ण त्याच्याशी फार लढला नाही असे म्हटले आहे. त्यात तितकेसे तथ्य वाटत नाही. एका ब्राह्मणाने क्षत्रियकन्या जिंकली, म्हणून सर्व राजे रागावून लढाई करावयाला निघाले होते. कर्णानेही लढाई केली आणि मग हे अर्जुन ब्राह्मण आहे, म्हणून लढाई अर्ध्यावर सोडून दिली, विचित्र दिसते. ह्या ब्राह्मणाला चोपून काढायला वेळ लागणार नाही, असे सर्वांना वाटले होते. पण जेव्हा अर्जुन व त्याच्या मदतीला भीम ह्यांनी अचाट पराक्रम केला, तेव्हा मध्येच 'तू ब्राह्मण आहेस का कोण आहेस?' हा प्रश्न विचारून लढाई सोडून देणे अप्रस्तुत वाटते.
 द्यूतपर्वात एका तऱ्हेने सर्वांचीच परीक्षा झाली. 'आता काय झाले, आता काय झाले' असे विचारणाऱ्या, हावऱ्या, आंधळ्या धृतराष्ट्राची परीक्षा झाली. पांडवांनी सगळे घालवले, तेव्हा 'गौ, गौ, गौ, गौ' म्हणून ओरडणाऱ्या दुःशासनाची परीक्षा झाली. द्रौपदी- - वस्त्रहरणाच्या वेळी होणाऱ्या हिडीस प्रकाराला आळा घालावा म्हणून धडपडणाऱ्या विदुराची परीक्षा झाली. त्याचबरोबर ह्या सर्व लोकांशी ज्याचे काही नातेगोते नव्हते, त्या कर्णाचीही परीक्षा झाली व तो सर्वस्वी हीन ठरला. द्रौपदीला सभेत ओढून आणलेली होती. ती दासी आहे किंवा नाही, ह्या प्रश्नाचा ऊहापोह चालू होता. दुर्योधनाचा धाकटा भाऊ विकर्ण उठून म्हणाला होता की, 'अशा तऱ्हेने सतीला ओढून आणणे बरोबर नाही, ती दासी होत नाही.' या वेळी कर्ण रागारागाने उभा राहिला व त्याने विकर्णाची निर्भर्त्सना केली. "पाच पुरुषांची बायको, ही कसली पतिव्रता! ती तर स्वैरिणीच. तिला सभेत ओढून आणणे ह्यात गैर काहीच झाले