पान:युगान्त (Yugant).pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १२७



आठ



मी कोण ?



 माणसाने कोठची तरी गोष्ट सिद्धीस जावी म्हणून ध्यास घेतला व मोठ्या प्रयत्नाने ती सिद्धीस नेली, तरी त्या सिद्धीपायी त्याला फार गोष्टी गमवाव्या लागतात. मानवाचे यश शंभर टक्के तर असत नाहीच. पण पन्नास टक्केसुद्धा हातात पडायची मारामार होते. ‘ज्याला जय म्हणतात, तो मला तर पराजयासारखाच वाटतो आहे,' असे म्हणणारा धर्म हेच सांगतो. (जयोऽयमजयाकारो भगवन् प्रतिभाति मे। १२.१.१५) ह्या सत्याचीच दुसरी बाजू महाभारतात फार विदारक रीतीने दाखवली आहे. ती म्हणजे वैफल्य, हा मानवी जीविताचा स्थायी भाव होय, ही. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती पराजित व निराश आहे. पण पराजयाबरोबर काही वेळा तरी इतरांच्या वाट्याला जय आलेला आहे. एक व्यक्ती मात्र सर्वस्वी पराजित, असफल व अकृतार्थ आहे. भवभूतीने सीतेला 'मूर्तिमंत विरह' म्हटलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे कर्ण हा मानवी शरीर धारण केलेले वैफल्य म्हणता येईल. कर्णाशी समदुःखी, समदैवी असा विदुर होता. पण दोघांच्या बाबतीत जरी काही घटना सारख्या असल्या, तरी काही इतक्या निराळ्या होत्या की, त्यामुळे