पान:युगान्त (Yugant).pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १२१

आहोच.' ह्या आग्रहाला कंटाळून-बोलणे थांबवण्यासाठीच असावे, दुर्योधन शेवटी म्हणाला, “आज मला विश्रांती घेऊ दे. काय करायचे, ते उद्या ठरवू." "

लढाईच्या शेवटच्या दिवसाचा हा वृत्तान्त फारच महत्त्वाचा

आहे. दुर्योधनाच्या कृतीवरून असे दिसते की, तो जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करीत होता. तो लांब रानात पाण्याखाली लपून बसला होता, व त्याने संजयाकरवी बापाला झाल्या गोष्टीबद्दल निरोप पाठवला होता. सर्व सैन्य उद्ध्वस्त झाले होते. धृतराष्ट्राने पांडवांना विशेषतः धर्माला- बोलावणे पाठवून 'राज्य घे, पण मुलाला उरल्या-सुरल्या एका मुलाला जीवदान दे, " असे म्हटले असते तर धर्माला ह्या विनंतीला मान द्यावाच लागला असता. कदाचित राज्याचा एखादा लहानसा तुकडासुद्धा द्यावा लागला असता. पण जोपर्यंत बापलेक असे दोघे जिवंत राहिले असते, तोपर्यंत पांडवांना निर्वेध राज्य कधीच करता आले नसते. दुर्योधन वेळ काढू पाहत होता, तर धृतराष्ट्राकडून काही बोलावणे येण्याच्या आत दुर्योधनाला काढून मारावयाचे, असा पांडवांचा बेत होता.

अश्वत्थाम्याचे राजाशी मोठमोठ्याने बोलणे चालू असतात

शिकारीच्या निमित्ताने काही व्याध आले. हे लोक भीमाच्या मर्जीतले होते. भीमाला मांस आवडे व तो चांगले पैसे देई, म्हणून ही माणसे रोज शिकार मारून ती पांडवांच्या शिबिरात पोहोचवीत असत. थोड्या वेळापूर्वीच दुर्योधन सापडत नाही, म्हणून रथातून परतताना त्यांनी पांडवांना व पांचालांना पाहिले होते. 'कोठे बरे दुर्योधन लपला असेल ?' म्हणून त्यांचे परस्पर संभाषणही त्यांनी ऐकले होते. डोहाकाठी मोठमोठ्याने चाललेले बोलणे त्यांनी ऐकले व त्यांना कळून चुकले की, दुर्योधन येथे लपून बसला आहे. 'अरे, शिकारीच्या मांसाच्या कितीतरी पट द्रव्य भीम आपल्याला देईल; चल, ही बातमी आपण त्याला सांगू या,' असे म्हणून ते तसेच धावत गेले व त्यांनी दुर्योधन कोठे लपला आहे, ते पांडवांना