पान:युगान्त (Yugant).pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १०७

तरी नागवंशाचे बीज निःसंशय होते. नागवंशाच्या ज्या मुलींशी लग्ने झाली, त्या राण्या झाल्या व त्यांचे मुलगे गादीवर आले. म्हणजे क्षत्रिय त्यांना आपल्यासमान मानीत असत असे दिसते. नाग- राजांची जी यादी आढळते, तीत तक्षकाच्या वंशाचे नाव नेहमी असते. तक्षकाच्या मुलाचे नाव 'अश्वसेन' हेही इतर क्षत्रिय नावांसारखेच आहे. अर्जुनाने ज्या उलुपी नावाच्या नागकन्येशी लग्न केले, ती कौरव्यकुलातली(!) होती, त्या कुलात 'ऐरावत' व 'धृतराष्ट्र' या नावांचे राजे होते. नागवंशातील एका कुलाचा पूर्ण नाश करण्याचा असा क्रूर प्रयत्न कृष्णार्जुनांनी का केला?
 'ब्राह्मणाने दान मागितले आम्ही दिले,' असे उत्तर समाधानकारक वाटत नाही. ब्राह्मणाने प्रत्यक्ष द्रोणाने - द्रुपदाचा पराभव करण्याचे दान मागितले होते व अर्जुनाने द्रुपदाला बांधून आणले, पण सर्व द्रुपदांचा काही नाश केला नाही. आपल्या विजेत्याला आपली मुलगी देताना द्रुपदाला दुःख झाले नाही. क्षत्रियांशी युद्धाची काही नीती होती. पण खांडवदाह-प्रकरणात कुठल्याच तऱ्हेचे विधिनियम दिसत नाहीत. नागांचा संहार हेच एक उद्दिष्ट दिसते. कृष्णाने लहानपणी यमुनेच्या डोहात राहणाऱ्या कालियानागाचा पराभव करून त्याला यमुनेतील राहण्याचे ठिकाण सोडावयास लावले होते. कृष्णाच्या निरनिराळ्या हेतूंपैकी यमुनेच्या प्रदेशातून नागांची हकालपट्टी करणे हाही एक हेतू होता, अशी शंका मनात येते. हा हेतू साध्य करण्यासाठी तेथील नागांचा निर्वंश करण्याचे धोरण क्रूर तर होतेच, पण ते उघड-उघड फसले हेही पुढील कथेवरून दिसून येते. ज्यू लोकांचा निर्वंश करायचा, अशा हिटलरी धोरणांपैकीच ते वाटते. त्याचा हेतू तर साध्य झाला नाहीच, पण तीन पिढ्यांचे वैर मात्र पदरी पडले. सहस्त्रावधी नाग व इतर वंशाचे लोक तडफडत, तळतळाट करीत मेले.
 ह्यातून वाचलेला मय हा एक असुर होता. तो उत्तम कारागीर होता. कृष्णाच्या आज्ञेने त्याने पांडवांना एक अप्रतिम सभा बांधून