पान:युगान्त (Yugant).pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२ / युगान्त

सुमारे पाच-सहाशे वर्षांनी पश्चिमेकडच्या वनांची वर्णने येत नाहीत. पण पूर्वेकडे वेळूवन, जेतवन वगैरे लहान-लहान वनांची नावे व वर्णने येतात. हजार-दोन हजार वर्षांत जवळ-जवळ सर्व राने नाहीतशी होऊन सिंधूपासून गंगा - सागरापर्यंत एक सपाट शेत झाले आहे. विलायतेतही मोठाली अरण्ये होती. ती जाऊन त्यांच्या जागी शेते झाली. जेव्हा विलायतेतील लोक दक्षिण व उत्तर अमेरिकेत गेले. तेव्हा त्यांनी राने तोडली वा जाळली, व सपाट मैदान करून शेती केली. धर्म खांडवप्रस्थाला आला, तेव्हा त्याने आपल्या नव्या राजधानीत वाणी वगैरे लोक आणून बसवले. प्रत्येक राजधानीच्या भोवती शेते असत व शेताच्या पलीकडे राने पसरलेली असत. तशाच तऱ्हेचे पांडवांचे राज्य होते. खांडववनाशेजारी 'इक्षुमती' ही लहान नदी व शेजारी यमुना नदी. खांडववनाचे नावही लक्षात ठेवण्यासारखे आहे. 'खाण्डव' हा शब्द 'खण्डु' शब्दापासून बनलेला. 'खण्डु' म्हणजे जाड खडीसाखरेसारखी साखर, काहीतरी गोड पदार्थ एवढे खरे. शेजारी 'इक्षुमती' नदी. इक्षू म्हणजे ऊस. 'इक्षुमती' हेसुद्धा नाव काहीतरी गोड पदार्थ नदीकाठी होता असे दाखवते. कृष्णाच्या बाळलीला जेथे वर्णन केल्या आहेत, त्याचे नावही 'मधुवन' होते. तेही यमुनेशेजारचेच. 'इक्षुमती', 'खाण्डव', व 'मधुवन' ह्या शब्दांनी असे वाटते की, ह्या वनात काहीतरी गोड पदार्थ उत्पन्न होत होता. तो मध का? कदाचित असेलही. हल्ली मध्यभारतातील रानातून एक रम्य, विशाल वृक्ष आढळतो. त्याला 'मोह' किंवा 'महुवा' म्हणतात. ह्याचे संस्कृत नाव 'मधुक' असे आहे. मोहाचे झाड हे वन्यलोकांची एक कामधेनूच असते. झाडाची पाने पत्रावळीसाठी वापरतात. गोड सुवासिक मधाने भरलेल्या फुलांपासून दारू करतात. फुले वाळवून खातात. आतील चिकट रसात वळलेले लाह्यांचे लाडू मधुर असतात. कदाचित खांडववन अशा तऱ्हेच्या वृक्षांनी भरलेले म्हणूनही त्याला 'गोड' असे नाव असेल पण त्याची गोडी, त्याची पारख, तेथल्या सुंदर विशाल मधुर