पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गैरमुलखांतून प्रवास

तरी, लष्करी दृष्ट्या त्याला विशेष महत्त्व असल्याने इ. स. १९२२ मध्ये हिंदुस्थान सरकारने उदारपणाने अफगाण अमिरांस एक मोठी देणगी दिली, ती कोणती म्हणाल तर, लंडीखान्यापासून पुढे काबूलपर्यंत लागणाच्या तारा व खांब यांची! आणि अफगाण सरकारनेही फुकटचेॆं दान घ्यावयाचें नाही अशा वृत्तीचें प्रदर्शन करण्यापुरतेंच धोरण ठेवलें. राजकारणी प्रेमाने पुढे आलेलें बक्षिस स्विकारून अफगाण हद्दीत तारांचे खांब रोवण्यासाठी लागलेली मजुरी मात्र काबुलाधिपतींनी दिली. अशा प्रकारे या निकटवर्ति देशांत विद्युत्संदेशाचे दळणवळण इ. स. १९२२ पासून स्थापित झालें. वर्तमानपत्रासाठी इतरत्र असणाऱ्या सवलती या पेशावर-काबूलमार्गाने तारा गेल्या असतां मिळत नाहीत. प्रतिशब्दास तीन आणे हा अफगाणिस्तानास पाठवावयाच्या तारांचा दर आहे. अद्याप तेथे वर्तमानपत्रांचा प्रसार व्हावा तितका झाला नसल्याने ही सवलत मिळाली नसावी; पुढे यथाकाल अवश्य मिळेल अशी आशा आहे.

 पेशावरपासून कोहाटला जाण्याची सडक मध्यंतरी पांचसात मैल गैरमुलखांतून म्हणजे स्वतंत्र प्रदेशांतून जाते. रेल्वेने कोहाटशी दळणवळण असलें तरी सडकेचा प्रवास थोडक्यांत व जलदीने होतो. रेल्वेमार्गाने कोहाट एकशेंएकतीस मैल पडते तर मोटाररस्त्याने केवळ एक्केचाळीस मैलांचाच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरून प्रवास करतांना कांही काल स्वतंत्रतेचे वारें लागतें. त्या प्रांतावर अफगाण निशाण फडकत नाही आणि ब्रिटिशांचें यूनियन जॅक तर दृष्टीसही पडणार नाही. निशाणासारख्या चिंधोट्या मात्र ठिकठिकाणी पुष्कळशा लागलेल्या आढळतात. स्मशानभूमींत कोणा 'पुण्य' पुरुषाच्या थडग्याच्या बाजूस लोकांनी आपापली जीर्ण वस्त्रें फाडून लावलेली असतात. कारण,

२५