पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/152

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

वर्णन केले. दुकानदाराच्या कोटावर गुंड्या होत्या. त्या महात्मा गांधींच्या गुजराथी वेषांतील चित्रांकित असल्याने, “हा मनुष्य कोण?" असें त्याला विचारतांच 'न मीदानीम' (ठाऊक नाही ) इतके उत्तर देऊन, मला त्याने तोच प्रश्न टाकला. कोणी थोर पुरुष आहे इतकेच त्याला ठाऊक होते. त्याचे नांव 'गांधी' असे सांगून तो हिंदुस्थानांतील आहे असें मी सांगतांच दुकानदाराने, "गांधी मुसलमानच ना ?" असा सवाल केला. महात्माजींना सगळे जग कुटुंबवत् वाटत असल्याने सर्व लोक त्यांचे 'भाऊ' होत. पण हिंदी वातावरणाचा परिणाम मजवर साहजिकच झालेला होता आणि पुढील परिणामाची कल्पना नसल्याने "छे: छे:, गांधी हिंदु आहेत," असे मी सांगतांक्षणीच त्या दुकानदाराने 'का-फी–र' अशी अक्षरे डोळे मोठे करून तिरस्कारयुक्त वाणीने उच्चारली आणि ताडकन् सर्व गुंड्या तोडून फेकून दिल्या! आपली इतके दिवस वंचना झाल्याबद्दल त्याला अतिशय वाईट वाटले. कारण इतक्या दूरच्या खेडेगावी गांधीछापाच्या गुंड्या जाणें म्हणजे त्यांना बरीच किंमत पडली असली पाहिजे. "मग हिंदूही आमच्या प्रमाणे रुमाल बांधतात काय?" हा त्याचा प्रश्न कोणत्या वृत्तीने विचारला गेला असेल याची कल्पनाच करावी! गांधींनी गुजराथी रुमाल डोक्यास गुंडाळला होता व तेवढ्यावरून तेही इस्लामानुयायी असावेत अशी तेथील लोकांची समजूत होती. पेहेलवी टोपीचा कायदा त्या प्रदेशांत आणखी पांच वर्षे तरी पोहोचूं शकणार नाही असें वाटतें. त्या ठिकाणचे लोक पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे डोक्यास रुमालच गुंडाळीत. अस्तु.

 प्रवासांतील 'फराळ' ही साधाच असे. 'नून' (रोटी), 'मॉस' (दही), 'असाल' ( मध ) आणि 'प्याज' (कांदा)

१४६