पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 पेशावरचा परिचय–मुंबईहून पेशावर पंधराशें पंचेचाळीस मैल (जी. आय. पी. मार्गे) आहे. बी. बी. सी. आय.ने पंचाण्णव मैल जवळ पडतें. तेथे जाण्यास सोईच्या अशा गाड्या दोन्हीही रेल्वेंच्या आहेत. सर्वात अधिक सोईची जाणारी गाडी बी. बी. सी. आय्.ची फ्रॉंंटियर मेल असल्याने मी त्याच गाडीने आलों. सुमारे चव्वेचाळीस तासांत हा प्रवास झाला आणि पेशावरला येतांच पासपोर्ट अधिकाऱ्याकडे जाऊन माझ्या ‘ रहदारी 'वर शिक्का मारण्याविषयी विनंती केली. पण सरहद्दीवरील गडबडीमुळें तिकडे जाण्याची कोणासच परवानगी देतां येत नाही असें सांगण्यांत आलें.

 काबूलचा रस्ता जो अडला गेला तो अफगाण हद्दींंतलाच आहे. खैबर घाटापुढे डाका म्हणून अफगाणिस्तानांतलें एक गांव आहे. त्यानंतर जलालाबाद हें दुसरें शहर. आणि नंतर काबूल. अशा मार्गाने मोटारी जातात. सध्या जी गडबड चालली आहे, ती डाका व जलालाबाद यांच्यामध्ये असलेल्या भागांत आहे. सरहद्दीवरील प्रांतांत आफ्रिदी, वजिरी, महशुदी, बलुची इत्यादि अनेक रानटी जातींचे लोक आहेत. त्या सर्वांत ‘शिनवरी' म्हणून जी जात आहे ती विशेष नाठाळ आहे. त्यांच्यावर सत्ता कोणाचीच नाही. म्हणजे ते कोणालाच मानीत नाहीत आणि स्वत:पैकी कोणाला तरी मुख्य मानून त्याच्याच तंत्राने चालण्यासाठी लागणारी विचारशक्ति त्यांना नाही. थोडक्यांत सांगावयाचें तर प्रत्येकजण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र, आहे ! त्यांचा प्रांत अफगाणाधिपतीच्या सत्तेखाली मोडत असला तरी त्याच्यावर हुकमत गाजविणें आजपर्यंत कोणालाही शक्य झालें नाही. राजा हा त्यांचा केवल 'शब्दपति' होय असे म्हटलें तर अतिशयोक्ति होणार नाही. लूट, मारहाण, चोरी हे तर त्यांचे वडिलोपार्जित धंदे