पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असं विरजण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

नाट्य व 'सीन्स'

 लोक, स्वप्नरंजनात अनेक लैंगिक नाट्यांचा विचार करतात. त्यातील अनेकांची नाट्य स्वप्नरंजन म्हणूनच राहतात, तर काहीजण यातील काही नाट्य (विशेषत: जी नाट्य बेकायदेशीर नाहीत) करून लैंगिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. काहीजण तर अगदी एकाग्रतेने ती नाट्य करण्यासाठी कंबर कसतात. आपल्या इच्छांशी समांतर, आपल्या आवडींशी मिळतेजुळते जोडीदार शोधायचा

प्रयत्न करतात. उदा. जोडीदाराने आवडता नेव्ही किंवा पायलटचा युनिफार्म घालणं, (काहींना स्त्रीनं 'हंटरवाली' झालेली आवडते); जोडीतील एकजण शिक्षक आहे आणि जोडीदार विदयार्थी आहे असा रोल प्ले करून शिक्षकानी विदयार्थ्याला 'शिक्षा' करणं; एकजण वेश्या आणि एकजण गि-हाईक आहे असं नाट्य करणं इत्यादी. असे असंख्य मार्ग आहेत ज्यांनी लैंगिक कृतीला वेगळी रंगत येते.

संभोगेतर लैंगिक सुखाचे मार्ग

 वरील लैंगिक सुख मिळवण्याच्या प्रकारांव्यतिरिक्त काहीजणांना चाकोरी बाहेरच्या मार्गातून लैंगिक सुख मिळवायला आवडतं. काही पुरुष व स्त्रियांना जोडीदाराला बांधून त्यांच्यावर सत्ता गाजवायला आवडते. तर काही पुरुष व स्त्रियांना आपल्याला बांधल्यावर सत्ता गमावल्यामुळे (किंवा दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून राहिल्यामुळे) लैंगिक उत्तेजना येते. काही पुरुष व स्त्रिया जोडीदाराकडून मार खाऊन उत्तेजित होतात (मासोकिझम), तर काहींना जोडीदाराला मारून उत्तेजित व्हायला होतं (सेडिझम). या प्रकारांत दोघंही राजी असतील तरच हे जमून आणता येतं. यात लैंगिक कृतीबरोबर सत्तेचाही खेळ असतो. सत्ता मिळवण्यातून येणारी लैंगिक उत्तेजना व स्वातंत्र्य गमावल्यावर हतबलतेतून लैंगिक उत्तेजना मिळते. काही पुरुषांना लहान बाळासारखं वागून उत्तेजना मिळते (इनफॅन्टिलिझम).

काहींना आपल्या जननेंद्रियांचं प्रदर्शन इतरांसमोर करून त्यांना धक्का दयायला आवडते. (एक्झिबिशनिझम). काहींना आपल्यावर जोडीदाराने सू सू केल्याने लैंगिक सुख मिळतं ('गोल्डन शॉवर').

 काहींना एखादया अलैंगिक कृतीतून लैंगिक उत्तेजना मिळते उदा. काहींना बूट, चपला, विशिष्ट कपडे चढवून लैंगिक उत्तेजना मिळते व मग ते संभोग करण्यास प्रवृत्त होतात. ही (फेटिश) आवडती गोष्ट जर उपलब्ध नसेल तर त्या व्यक्तीला उत्तेजित होण्यास किंवा संभोग करण्यास अडचण येते.

८२

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख