पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या/तिच्या संमतीला संमती मानता येत नाही.). अनेक वेळा नवरा, बायकोची संमती आहे हे गृहीत धरतो. जोडीदाराला एखादी कृती आवडते की नाही? का नाही आवडत? याच्यावर कोणत्या प्रकारे तोडगा काढता येईल, कोणत्या कॉन्सेलरची मदत घेता येईल, याच्यावर काही संवादच होत नाही.

 संवादाचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे दोघांमधील समानतेचा. अनेक पुरुष स्वीकृत जोडीदाराला (मग ते स्वीकृत जोडीदार स्त्री असो किंवा पुरुष असो) कमी लेखतात. ते त्या व्यक्तीबरोबर संभोग करतात पण ते करताना किंवा केल्यावर त्यांना त्या स्वीकृत भूमिका घेणाऱ्या व्यक्तीबद्दल चीड येते किंवा किळस वाटते. एकजण म्हणाला, “कोणतीही बाई कशी काय दुसऱ्या पुरुषाबरोबर स्वीकृत भूमिका घेते? म्हणून मला बायकांची खूप घृणा वाटते." किंवा जसा मला एक इन्सटिव्ह' भूमिका घेणारा समलिंगी पुरुष म्हणाला, “कोणताही पुरुष स्वीकृत भूमिका कशी काय घेतो? बाईने अशा खालच्या दर्जाची भूमिका घेणं ही गोष्ट वेगळी, पण पुरुषाने अशी खालच्या दर्जाची भूमिका का घ्यावी?" स्वीकृत किंवा इन्सटिव्ह भूमिका घेणं हा ज्याच्या त्याच्या नैसर्गिक घडणीचा भाग आहे. तो स्त्रियांना, स्वीकृत भूमिका घेणाऱ्या समलिंगी पुरुषांना दिलेला पर्याय नाही. त्यामुळे कोणाला कोणतीही भूमिका घ्यायची इच्छा झाली तरी त्यात चुकीचं, कमीपणा वाटायचं काय कारण आहे?

 याचाच दुसरा एक पैलू म्हणजे संभोगात 'वूमन ऑन टॉप पोझिशन' बद्दलची पुरुषांची दृष्टी. अनेक पुरुषांना ही पोझिशन कमीपणाची वाटते. स्त्री आपल्या वरती आहे ही गोष्ट आपल्या पुरुषार्थाला शोभणारी नाही, अशी दृष्टी असते. जर आपण व आपला/आपली जोडीदार समान आहोत हे जाणलं तर अशी नकारात्मक भावना मनात येणार नाही. दोघंजण जरी वेगवेगळ्या भूमिका घेत असले तरी दोघंही समान आहेत ही वैचारिक प्रगल्भता नसेल तर साहजिकच ते लैंगिक नातं कधीही परिपूर्ण बनत नाही.

निवांत वेळ

 दोघांना संभोगाचा पूर्ण आनंद मिळण्यासाठी निवांत वेळेची गरज असते. 'फोरप्ले' करायला वेळ मिळाला नाही किंवा घाईगडबडीत उरकावं लागलं, तर दोघंही असमाधानी राहतात. अनेकांच्या घरी एकांत मिळण्याची संधी खूप कमी असते व त्यामुळे जेवढा निवांत वेळ जोडप्याला मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही.

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

७१