पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठं व छोटं भगोष्ठ, योनीचा भाग वापरून, कंबर किंवा मांडीचं कातडं वापरून कृत्रिम लिंग आणि वृषणकोष घडवले जातात. वृषणकोषात कृत्रिम वृषण बसवले जातात.

 स्त्रीपासून पुरुष झालेल्या व्यक्तीच्या शरीरात वीर्य व पुरुषबीज निर्मिती होत नाही. बसवलेल्या लिंगातून लघवी येते पण लिंगाला उत्तेजना येऊ शकत नाही. म्हणजेच तो पुरुष दुसऱ्या स्त्रीच्या योनीत लिंग प्रवेश करून संभोग करू शकत नाही. स्त्रीपासून पुरुष बनलेल्या व्यक्तीपासून स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही.

सावधान : काही सर्जन, प्रयोगाची संधी मिळते म्हणून पुरेसं कौशल्य न मिळवता या शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक असतात. जर शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर पुढे अनेक अडचणी उद्भवू शकतात. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर स्वस्तात शस्त्रक्रिया करायला तयार आहेत एवढा एकच आर्थिक निकष लावू नये. डॉक्टरांना या विषयाचा किती अनुभव आहे हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे

संप्रेरक

 शस्त्रक्रियेनंतर, काहीजण गोळ्या / इंजेक्शनमार्फत काही संप्रेरक घेतात. काहीजण शस्त्रक्रिया करतात पण संप्रेरकांची औषधं घेत नाहीत. या औषधांचे काही दुष्परिणाम आहेत म्हणून, जर संप्रेरक घेणार असाल तर ही औषधं डॉक्टरांच्या ('एन्डोक्रिनॉलॉजिस्ट') निदर्शनाखालीच घ्यावीत.

  स्त्रीत रूपांतर झालेल्या व्यक्तीला काही विशिष्ट संप्रेरकांची इंजेक्शन / गोळ्या घेऊन शरीराला गोलाई येते, स्तनं वाढतात.

 पुरुषात रूपांतर झालेल्या व्यक्तीला काही विशिष्ट संप्रेरकांची इंजेक्शन/गोळ्या घेतल्यानं स्तनं बसतात, आवाज बसतो. अंगावरचे केस वाढतात.

  शरीराला पुरवलेले संप्रेरक शरीर हळूहळू वापरत असतं म्हणून हे संप्रेरक ठरावीक काळाने परत परत इंजेक्शन / गोळ्यांमार्फत पुरवावे लागतात.

  पुनर्जन्म

  इतक्या वर्षांची तळमळीची इच्छा पुरी झाल्यावर खूप मानसिक थकवा येतो. आपल्या पूर्वीच्या आयुष्याला पूर्णविराम दिल्यामुळे काही काळ खूप नैराश्य येतं. हा पुनर्जन्म सोयीस्कर व्हावा म्हणून संवेदनशील कॉन्सेलर, घरची मंडळी, मित्र, सहकारी मंडळी, या व्यक्तींना आधार देण्याची मोठी भूमिका बजावू शकतात. काहीजण आपल्या नव्या जीवनशैलीत सहज मिसळून जातात, तर काहीजणांना नव्या जीवनशैलीत रुजायला वेळ लागतो. शस्त्रक्रियेनंतर काहीजण आवाज

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

४३