पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना




 “मी हे सगळं गुंडाळून दृष्टिआड केलं आणि आज परत तू याची आठवण करून दिलीस." मी ओशाळलो. मग तो म्हणाला, "मला बोलायला खूप त्रास होईल. मी लिहून काढतो. लिहून देण्याचा एकच उद्देश. माझ्या अनुभवातून दुसऱ्या एखादयाला आधार मिळेल. माझ्याशी त्याला 'रिलेट' करता आलं तर कदाचित त्याला मदत होईल."

 अनेकांनी आपल्या वाट्याला आलेल्या लैंगिक समस्यांना आपल्यापरीने अर्थ लावून ती गाठोडी माळ्यावर टाकून ठेवली आहेत. ती गाठोडी माळ्यावर आहेत हे सुद्धा अनेकजण विसरायचा प्रयत्न करतात. आपण एकटे एखादया प्रसंगातून किंवा प्रश्नातून जात नाही आहोत, अशा त-हेचे प्रश्न अनेकांना पडले आहेत, ही जाणसुद्धा मोठा मानसिक आधार देते. आपली समस्या सांगून काहींच्या मनावरचा ताण कमी होतो. कोणीतरी समस्या समजून घेणारे आहे, (ऐकणाऱ्यापाशी उत्तर नसले तरी) हा देखील मोठा आधार ठरतो. समस्या आहे पण ती बोलूनसुद्धा दाखवता येत नाही, याच्याइतके हाल दुसरे कुठलेच नाहीत हा माझा अनुभव आहे. कोणतीही समस्या असो, ती व्यक्त केल्याशिवाय तिच्यावर अभ्यास होऊ शकत नाही. अभ्यास होत नाही तोवर तिच्यावर काही उत्तरे आहेत का, याच्यावर काम होत नाही. प्रश्नच कळले नाहीत, तर उत्तरे कशी शोधणार? म्हणून या पुस्तकाचा अट्टाहास.

 २००२ साली मी 'समपथिक ट्रस्ट' संस्था पुण्यात सुरू केली. तेव्हा माझा उद्देश होता की समलिंगी व्यक्तींसाठी काम करायचे (कारण मी समलिंगी आहे.) जसजसे माझे काम वाढत गेले, तसतसे समलैंगिकतेवर बोलायला मला वेगवेगळ्या संस्था बोलावू लागल्या. तेव्हा या विषयाबरोबर 'लैंगिक इच्छा', 'लैंगिक सुख' यांच्यावर बरेच प्रश्न यायचे, 'ब्लू फिल्म्स' बघून झालेले गैरसमज, वर्तमानपत्रात वाचलेल्या बातम्या व त्यातून निर्माण झालेला गोंधळ, कुठल्यातरी

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख