पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून काही वेळा सकाळी उठल्यावर मुलांचे/पुरुषांचे लिंग अर्ध ताठरलेलं दिसतं. लघवी केली की लिंगातील ताठरपणा जातो.

लैंगिक शोषण

 कोणी व्यक्ती लहान मुला/मुलींच्या जननेंद्रियांशी खेळत असेल, तर त्या लहान मुला/मुलीला स्वत:च्या जननेंद्रियांना हात लावायची सवय लागू शकते. तसंच जर कोणी व्यक्ती लहान मुला/मुलीला त्या व्यक्तीच्या जननेंद्रियांशी खेळायला लावत असेल, तर या मुला/मुलीला इतर व्यक्तींच्या जननेंद्रियांना हात लावायची सवय लागू शकते. (बघा, सत्र - लैंगिक अत्याचार.)

झोपेत सुसू होणे (एन्युरेसीस)

 लहान मुलं जशी मोठी व्हायला लागतात तसतसं त्यांचं लघवीवर नियंत्रण यायला लागतं. पण काही मुला/मुलींना लघवीवर नियंत्रण यायला वेळ लागतो. याची मुलांना लाज वाटते व आईवडिलांनाही याचा त्रास होतो. पालकांनी त्याला नांव ठेवणं, चेष्टा करणं, शिक्षा करणं कटाक्षानं टाळावं. बहुतांश वेळा ही समस्या वयाच्या १२ ते १४ वर्षांपर्यंत आपोआप सुटते. जर या नंतर ही समस्या सुटली नसेल, तर 'युरॉलॉजिस्ट' चा सल्ला घ्यावा. तोपर्यंत झोपायच्या आधी लघवीला जाणं, गजर लावून मध्यरात्री उठून लघवी करून परत झोपणं अशा विविध मार्गाचा अवलंब करावा.

जरा समजायला लागलं की

 जसजसं वय वाढायला लागतं तसतसं मुलांना आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टीबद्दल कुतूहल वाढायला लागतं. मुलं चौकसखोर बनतात. आईवडिलांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात, “आम्ही कुठून आलो?" किंवा "बाळ कसं होतं?" हे प्रश्न बहुतेक पालकांच्या कानी आलेले आहेत. लहान मुलांना याचं कसं उत्तर दयायचं या संकोचामुळे पालक मुलांना, “तुला विकत घेतलयं", नाहीतर, "गप्प बस. फाजील कुठला" अशी उत्तरं देतात. या प्रश्नांची उत्तरं दयायची म्हणजे वात्सायनाचं कामसूत्र' समजून सांगावं लागणार अशी त्यांना उगाचंच भीती असते. (तशी वेळ आली तर आपल्यालातरी पुरेसं ज्ञान आहे का? ही शंकाही मनात असते.)

 मुलांना सगळ्या तांत्रिक गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. कारण त्या वयात त्यांना तांत्रिक गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे “बाळ पोटाच्या खालच्या भागात वाढतं." "बाळ पोटाच्या खालच्या भागातून बाहेर येतं" एवढं म्हटलं तरी चालतं. उत्तर

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख

१७