पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंगवायनल हर्निया गर्भार मातेच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होताना, गर्भाचे वृषण त्याच्या वृषणकोषात उतरतात. काही वेळा या वाटेतून आतड्याचा काही भाग वृषणकोषात उतरू शकतो. त्यामुळे आतडं वृषणकोषात उतरल्यावर वृषणकोष मध्येच फुगतं व आतडं परत पोटात गेल्यावर परत वृषणकोष छोटं होतं. जर आतड्याचा काही भाग वृषणकोषात उतरला व त्याला चिमटा बसला तर त्या आतड्याच्या भागाचा रक्तप्रवाह बंद होऊन आतडं सडायला लागू शकतं. असा आतड्याचा भाग वृषणकोषात उतरण्याला इंगवायनल हर्निया' म्हणतात. नवजात बालकात जर 'इंगवायनल हर्निया' दिसत असेल तर, काही वेळा साधारपणपणे दीड वर्षात हा प्रश्न आपोआप निसर्गतः सुटतो. हा प्रश्न निसर्गतः सुटायची वाट पाहायची असेल तर या काळात डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे त्या मुलाची मधूनअधून तपासणी करणं गरजेचं आहे. या कालावधीनंतर जर ही समस्या सुटली नसेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. 'इंगवायनल हर्निया' मोठेपणी, म्हातारपणीही होऊ शकतो. पूरस्थ ग्रंथीची वाढ जसजसं वय वाढतं तसतशी पूरस्थ ग्रंथी मोठी होऊ लागते. काहीजणांमध्ये पूरस्थ ग्रंथीच्या वाढीमुळे तिच्यामधून जाणारा मूत्रमार्ग अरुंद होतो. याच्यामुळे वयस्कर पुरुषांना थोडी थोडी लघवी होणं, पूर्ण लघवी न होणं, परत परत लघवीला जायला लागणं अशा तक्रारी दिसू लागतात. हा त्रास फार वाढला तर औषधं किंवा शस्त्रक्रियेचा आधार घेतला जातो. छिद्रं नसलेलं योनिपटल बहुतेक मुलींच्या योनिपटलाला एक किंवा अनेक छिद्रं असतात. जेव्हा वयात आल्यावर पाळी सुरू होते, तेव्हा पाळीचं रक्त या छिद्रातून बाहेर येतं. क्वचित काही केसेसमध्ये योनिपटलाला एकही छिद्र नसतं. यामुळे वयात आल्यावर पाळी सुरू झाली तर योनीतून रक्त बाहेर येण्यास मार्ग नसतो. त्यामुळे रक्त योनीतच राहतं व ओटीपोटात दुखू लागतं. डॉक्टरांनी तपासून योनिपटलाला छिद्र नाही हे निदान केलं, तर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून या योनिपटलाला छेद दिला जातो जेणेकरून पाळीचं रक्त बाहेर यायला मार्ग मोकळा होतो. मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख ९५