पान:माझे चिंतन.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यात सांगितलेले आहे. श्रीकृष्ण हा हिंदुस्थानात परमेश्वराचा अवतार गणला जातो. त्याच्या गोकुळच्या लीला आणि त्याची गीता एवढ्याचाच सामान्यतः भारतीयांना परिचय असतो. पण महाभारतात याहून फार निराळे असे त्याचे चरित्र दिसून येते. तो एक असामान्य, अलौकिक, अद्वितीय पण मानवी पुरुष होता असेच त्याचे रूप महाभारतावरून दिसते. त्या रूपाचे वर्णन या निबंधात केले आहे. विश्वरूपदर्शनापेक्षा मला ते जास्त प्रिय आहे.
 ' युद्ध अटळ आहे काय ? ' –ही काहीशी तात्त्विक चर्चा आहे, असे वाटेल. काही अंशी ती तशी आहेही. पण सर्वस्वी नाही; कारण कॉमन मार्केटच्या उदाहरणांवरून अगदी अंधुक का होईना पण तशी आशा करण्यास जागा आहे असे वाटते. आणि आपल्या विकासासाठी चिरकालीन शांततेची अपेक्षा धरणाऱ्या भारताने तर त्या अंधुक आशेच्या बळावर सतत प्रयत्नशील राहणेच हितावह होईल. असे असल्यामुळेच आणि सर्व जगापुढची ती अत्यंत जटिल समस्या असल्यामुळे त्या निबंधाचा या संग्रहात समावेश केला आहे.
 ' माझे चिंतन ' या माझ्या पुस्तकाची प्रथमावृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वाचकांची मला पत्रे आली. आपल्या समाजाच्या अगदी जिवाला लागलेल्या अशा या समस्या आहेत असे त्यांचेही मत दिसले.
 अशा समस्यांचे विवेचन करणाऱ्या या निबंधांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी व तरुणांनी भावी जीवनाच्या दृष्टीने करावा. या अभ्यासामुळे त्यांच्या विचारांना काही निश्चित दिशा लागेल अशी आशा मी करतो.

पु. ग. सहस्रबुद्धे