पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[ ६७


नसते. तथापि सॉक्रेटिसाच्या शिष्यांचा त्याच्याविषयीचा आदर त्याच्या नकटेपणामुळे नष्ट झाला नाही, त्याप्रमाणें चित्ताकर्षक नसणाऱ्या वाङ्मयालाहि, तें सुविचारपूर्ण ज्ञानप्रद असल्यास, उपासक मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र हौस व अुद्योग पाहिजे.
 (५३) वाङमयलेखनाच्या आवडीने मी अनेक ग्रंथ लिहिले असले तरी माझी लेखनव्यासंगाची खरी हौस केसरी वर्तमानपत्रानेच भागविली. हौस व ती भागविण्याचें साधन यांचा संयोग दुर्मिळ असतो. पण सुदैवाने माझ्या बाबतींत तो संयोग आयताच साधला. तो असा की, केसरीसारख्या मोठ्या व प्रतिष्ठित अशा वर्तमानपत्रांत 'हवें तें, हवें तितकें, व हवें तेव्हा' लिहिण्याला भरपूर वाव असल्याने, मला विचार-प्रगटीकरणाचे जे जे मार्ग सुचले त्या सगळ्यांचा प्रयोग मला करून पाहतां आला. परंतु वर्तमानपत्रांत लिहिणें हाच मुख्य व्यवसाय होअून राहिल्याने मी वाङ्मयाचे अितर कोणतेहि कितीहि प्रकार लिहिले तरी, माझ्या लेखनाचा मुख्य प्रकार निबंध हाच ठरतो. आणि ही निबंधी पद्धति अितर प्रकारांतहि सांपडेल तेथे आपलें डोकें वर काढते. माझें निबंधलेखन हेंच माझ्या वाङमयांतील मुख्य अंग ठरतें असें प्रा. ना. सी. फडके यांना वाटतें. म्हणून त्या दृष्टीने त्यांनी याविषयी जें मत प्रकट केलें आहे त्यांतील अुतारे याखाली देतों-
 " या वैभवाच्या स्थितींत केसरी असतांना व लोकजागृतीच्या व भाषावृद्धीच्या अशा दोन्ही दृष्टींनी मराठी निबंधलेखनास भरती येत असतांना, १८९६ सालीं अशा अेका व्यक्तीचा केसरीशीं व केसरीच्या द्वारें मराठी भाषेशीं ऋणानुबंध जडला की, तिनं पुढील तीन तपांत आपल्या अव्याहत विविध लेखनानं निबंधलेखनाच्या वाङमयप्रकारास अत्यंत हृदयंगम स्वरूप आणलं, आणि मराठी भाषेचं गुप्त सौंदर्य लोकांच्या पूर्ण निदर्शनास आणून दिलं. या व्यक्तीचं नांव नरसिंह चिंतामण केळकर !
 "व्यासंग, तर्क आणि विवेक या गुणांचा त्यांच्या ठिकाणीं अत्यंत अुत्कर्ष झालेला असून आपल्या मनांतील विचार अत्यंत सुसंगत पद्धतीनं, अतिशय नीटनेटक्या थाटांत, व कमालीच्या डौलदार भाषेंत, व्यक्त