Jump to content

पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[१३१


अुपयोगी पडत नाहीत. पण त्यागाश्रित पुण्याअी व अध्यात्मसंस्कृति ही मात्र आत्म्याबरोबर परलोकीं जाअूं शकते. आपल्या सर्व भारतीय शास्त्रदर्शनांची फलश्रुति मोक्ष हीच सांगितलेली असते नव्हे काय ? मात्र अशा प्रकारच्या युक्तिवादाशिवाय वाङ्मयसाहित्यमंडित कवि व पंडित यांना समाजांत श्रेष्ठ स्थान कां देण्यांत येतें याची अुपपत्ति लागू शकत नाही. मात्र जे कोणी परलोक मानीत नाहीत ते केवळ विद्वत्तेला अितकेंसें महत्त्व देत नाहीत. ते कर्तृत्व हाच मुख्य गुण मानतात. मग कर्तृत्वाच्या जोडीला विद्वत्ता असेल, तर तें अधिक चांगलें, द्विगुणित चांगलें, अितकेंच काय तें .
( १२७ ) साहित्य हें अेक संस्कृतिप्रकर्षाचें साधन आहे, आणि त्याबरोबर अितर कलांनाहि तशाच प्रकारचें साधन मानतां येतें. तथापि वाङमयसाहित्याला त्यांतल्या त्यांत श्रेष्ठपद मिळण्याचें आणखी अेक कारण हें असावें की, या साधनांचा पल्लेदारपणा अितरांहून अधिक आहे. मनुष्याचें मन व हृदय हीं खुलासेवार प्रकट करण्याची शक्ति वाचेच्या कलेंत, व तदनुसार लेखनकलेंत, जितकी आहे तितकी चित्र, नाट्य, नृत्य, संगीत यांत नाही. अंतिम आनंद सर्व कला सारख्याच देतात. स्वतःला क्षणभर विसरून जाणें हें आनंदाचें अंतिम गमक मानलें, तर तो आनंद सर्व कला सारख्याच प्राप्त करून देतील. पण कर्तृत्वाच्या दृष्टीने व कार्यव्यापाच्या दृष्टीने पाहतां वाङमयकला या अधिक पराक्रमी ठरतात. अितर कलाकृतींचे निर्माते व त्यांचें सौंदर्य अुपभोगणाऱ्या व्यक्ति यांचा मेळ पडणें फार दुरापास्त होतें. पण वाङ्मयाचें तसें नाही. पुस्तकांतून चित्रें छापतां येतात, फोनोग्राफच्या तबकड्यांत गायन लिहून त्याच्या प्रती काढतां येतात, तसेंच छाप बनवून मूर्तीहि तयार करतां येतात, आणि संगमरवरी ताजमहाल चार आण्याला मिळतो हें सर्व खरें. तथापि ग्रंथांची निर्मिति जितकी होते तितकी या अितर वस्तूंची होत नाही. शिवाय हाताळणें, वापरणें यांच्या सोयीच्या दृष्टीने हि वाङमयग्रंथ हा अधिक व्यवहार्य ठरतो. तसेंच जीवनाचें अगणित गुण व अगणित प्रकार प्रतिबिंब दाखविणें हें अगणित वर्णसमूहरूप वाणीला व लेखनाला जसें साधेल तसें मर्यादित व्याप्तीच्या चित्रांना, गीतांना, मूर्तींना, शिल्पकृतींना सावणार नाही.