पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



४.
महाराष्ट्रीय राजघराणी
 



स्वकीय राजसत्ता
 सातवाहनांनंतर पुढील हजार वर्षांच्या काळात महाराष्ट्रावर नंदिवर्धन व वत्सगुल्म ( नागपूर प्रांत ) येथील वाकाटक, बदामीचे चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव अशा पाच राजघराण्यांनी राज्य केले. इ. स. १३१८ साली दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी यादवांची सत्ता नष्ट केली आणि महाराष्ट्राला पारतंत्र्य आले. इ. स. २३५ पासून म्हणजे सातवाहनांच्या सत्तेच्या प्रारंभापासून इ. स. १३१८ पर्यंतचा सुमारे दीडहजार वर्षांचा काल हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा पहिला कालखंड होय. हा सर्व काल स्वराज्य, स्वातंत्र्य व साम्राज्य यांचा कालखंड होता. १३१८ साली या भूमीचे स्वातंत्र्य नष्ट झाले व तेथे परकी मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाली. ती इ. स. १६४७ पर्यंत टिकली. तीनसवातीनशे वर्षांचा हा काळ म्हणजे आपल्या इतिहासाचा दुसरा कालखंड होय. तेथून पुढे पुन्हा स्वराज्याचा व साम्राज्याचा काळ येतो. हा वैभवाचा काळ इ. स. १८१८ मध्ये समाप्त झाला. तेथे तिसरा कालखंड संपला. तेथून १९४७ मध्ये भरतभू स्वतंत्र होईपर्यंतचा चौथा कालखंड होय. या ग्रंथात या चार कालखंडांचा पृथकपणे इतिहास द्यावयाचा आहे. हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आहे. तेव्हा धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था, शिक्षण, विद्या, शास्त्रे, कला, साहित्य यांचाच प्रामुख्याने विचार यात होणार हे उघड आहे. पण मागे एका ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, स्वकीय राजसत्ता, राजकीय स्वातंत्र्य हा सर्व संस्कृतीचा मूलाधार होय. ' शस्त्रेण रक्षिते राज्ये शास्त्रचिंता प्रवर्तते ।' शस्त्रबळाने, राजसत्तेने