पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६९
मरहट्ट सम्राट सातवाहन
 

सतत स्वाऱ्या करून सम्राट सातकर्णीने पूर्वपश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र हे मुक्त केले. आणि उत्तरेकडील क्षत्रपांच्या ताब्यातील पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र हे प्रदेशही साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. पुढील काळात महेन्द्र, मलय, आंध्र, कलिंग हेही प्रदेश त्याने जिंकले व 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' - हे बिरुद त्याने सार्थ केले. नाशिकच्या लेखात त्याच्या मातेने त्याची राम, केशव, अर्जुन, भीमसेन यांच्याशी तुलना केली आहे, नहुप, जनमेजय, ययाती, सागर यांच्यासारखाच तो पराक्रमी होता असा त्याचा गौरव केला आहे. त्यात मातेचे कौतुक असले तरी सत्यार्थही बराच आहे असे आपणांस दिसून येईल.

सम्राट पुलुमायी
 इ. स. ७२ ते इ. स. ९५ या आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत शकआक्रमणाचा निःपात करून व सातवाहन साम्राज्यसत्ता पुन्हा दृढ व समर्थ करून गौतमीपुत्र मृत्यू पावला. त्याच्या मागून त्याचा पुत्र वसिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुलुमायी हा गादीवर आला. तोही पित्यासारखाच पराक्रमी होता. त्याने सातवाहन साम्राज्य दृढ करून वर्धमानही केले. दोन डोलकाठ्यांनी जहाजे - ही चित्रे असलेली त्याची नाणी कॉरोमांडेल किनाऱ्यावरील नगरीत सापडली आहेत. त्यावरून त्याची सत्ता समुद्रापर्यंतच नसून समुद्रावर आणि त्याच्याही पलीकडे पसरली होती हे आता सिद्ध झाले आहे. गौतमी- बलश्री हिने पुत्रासंबंधी नाशिकला शिलालेख कोरविला तो याच्या राज्याच्या १९ व्या वर्षी होय. तिने त्यात 'महाराजपितामही' असे स्वतःचे वर्णन केले आहे. कारण पुलुमायी हा तिचा नातू त्या वेळी सम्राटपदी होता. पुलमायी ( २ रा ) याने इ. स. ९६ ते ११९ अशी २४ वर्षे राज्य केले. त्यानंतर वसिष्ठीपुत्र श्री सातकर्णी हा बहुधा त्याचा भाऊ किंवा नातू - गादीवर आला. हाही पराक्रमी होता. त्याने १२० ते १४९ अशी तीस वर्षे राज्य केले. त्यानंतर शिवश्री पुलमायी हा सम्राट झाला. याच्या कारकीर्दीत सातवाहन —शकसंघर्ष पुन्हा सुरू झाला. वसिष्ठीपुत्र पुलुमायीच्या कारकीर्दीत अखेरीस दुसऱ्या एका शकवंशाने उत्तरेत सत्ता स्थापिली होती. चष्टन या त्या वंशातील क्षत्रपाने कच्छमध्ये राज्य स्थापन केले व हळूहळू राज्यविस्तारास प्रारंभ केला होता. त्याचा महत्त्वाकांक्षी नातू रुद्रदामा हा आता सत्तारूढ झाला. त्याचा शिवश्री पुलुमायीशी संघर्ष सुरू झाला व दोनदा त्याने पुलुमायीचा पराभव केला. गिरनार येथे रुद्रदाम्याचा शिलालेख आहे. त्यात 'रुद्रदाम्याने दक्षिणापथपतीचा दोनदा पराभव केला, पण त्याचा नाश केला नाही; कारण तो त्याचा जवळचा नातलग होता' असे वर्णन आहे. शिवश्री हा रुद्रदाम्याचा जावई होता असे एकमत आहे. दुसऱ्या मतान्वये वसिष्ठीपुत्र सातकर्णी हा जावई असून शिवश्री हा नातू होता. म्हणजे जवळचा नातलग होता हे निश्चित.
 श्री यज्ञ सातकर्णी हा सातवाहन वंशातील शेवटचा मोठा सम्राट होय. इ. स. १६० ते इ. स. १८९ अशी सुमारे तीस वर्षे त्याने सत्ता चालविली. याची नाणी गुजराथ,