पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६७
मरहट्ट सम्राट सातवाहन
 



गौतमीपुत्र
 हाल सातवाहनानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याचे चरित्र सांगावयाचे. ज्याचे यशोवर्णन करताना कवींना स्फूर्ती यावी, इतिहासकारांना अभिमान वाटावा व या भूमीला कृतज्ञतेने ज्याचे स्मरण राहावे असा हा सम्राट होता. सातवाहन कुलातील हा सर्वश्रेष्ठ राजा होय. मुस्लीम आक्रमणापासून महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या शिवछत्रपतींचे नाव जितक्या आदराने व भक्तिभावाने आपण घेतो तितक्या आदराने व भक्तिभावाने ज्याचे नाव घ्यावे असा महाराज, राजराज गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा राजा होऊन गेला. शकपल्हव यांनी केवळ भारतावरच नव्हे, तर पाश्चात्य जगावरही आक्रमण केले होते, आणि देशचे देश बेचिराख केले होते. सातवाहनांच्या साम्राज्यावरही इ. सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात शकांची टोळधाड कोसळली. त्यांची धडक एवढी प्रचंड होती की काही काल हे बलशाली साम्राज्यही मूळापासून हादरले. पण गौतमीपुत्राचा उदय झाला व त्याने या शकांचे निर्दाळण केले. नाशिक येथे या महापुरुषाची माता गौतमी बलश्री हिने आपल्या प्रियपुत्राची प्रशस्ती, मोठा लेख कोरून, चिरंतन करून ठेविली आहे. त्यात क्षहरातवंश निरवशेषकर, शकपल्हवनिषूदन, त्रिसमुद्रतोयपीतवाहन, असा त्याचा गौरव केला आहे तो अगदी सार्थ आहे.
 ग्रीकयवनांची जी भारतावर आक्रमणे झाली त्यांचा चंद्रगुप्त मौर्य, खारवेल व पुष्यमित्र शुंग यांनी निःपात केला, याचा निर्देश वर जागजागी आलाच आहे. यवनांच्या नंतर शकांच्या टोळधाडी भारतावर येऊ लागल्या. त्यानंतर युएची अथवा कुशान या रानटांचे आक्रमण झाले. त्यांनी तर दीर्घकालपर्यंत उत्तर भारतावर साम्राज्य स्थापिले होते. ते संपुष्टात आल्यावर हूणांच्या टोळधाडी येऊ लागल्या. पण भारतातले लोक त्या काळी समर्थ व पराक्रमी होते. त्यामुळे ही आक्रमणे त्यांनी निर्दाळून त्या आक्रमकांचा निःपात केला, इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक विजय मिळवून भारतीय समाजात व संस्कृतीत त्यांना संपूर्णपणे विलीन करून टाकले. शक लोक अशा क्रूर, रानटी जमातींपैकीच होते. उत्तरेत शुंगांनंतर समर्थ अशी राजसत्ता न राहिल्यामुळे त्यांना तेथे भराभर जय मिळाले व तेथे आपली राज्ये स्थापून ते नंतर दक्षिणेत घुसले. पण तेथे त्यांना गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलमायी, श्री यज्ञ सातकर्णी, असे प्रतापी सातवाहन सम्राट भेटले. त्यांनी दक्षिणेतून त्यांच्या सत्तेचे निर्मूलन करून टाकले.
 यवन, शक, कुशाण ( युएची ) व हूण या चार जमाती इ. स. चौथ्या शतकापासून इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत मधूनमधून आक्रमणे करीत होत्या. यांतील यवन हे ग्रीक होत. ते सुसंस्कृत होते. पण बाकीच्या तीन जमाती या रानटी होत्या. भारताच्या वायव्य सरहद्दीच्या वर एकापलीकडे एक थेट चीन देशापर्यंत शक- कुशाणांची वसतिस्थाने होती. भूगर्भात असलेल्या लाव्हारसासारखीच यांची स्थिती