पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
८००
 

देऊन गौरव केला आहे. पंढरीनाथ नागेशकर व यशवंतराव केरकर यांनी मुंबईत तबलजी म्हणून उत्तम कीर्ती मिळविली. रेडिओवर त्यांचे कार्यक्रम अनेक वेळा झाले. दोघांचेही मुंबईला तबल्याचे क्लास आहेत. याशिवाय अनेक तबलजी प्रारंभी सांगितलेल्या कारणामुळे गोव्यात उद्यास आलेले आहेत.
 मुरारखा गोवेकर हे गोव्याचे राहणारे. गाणे, सतार, तबला व पखवाज या कलांत प्रवीण होते. या विषयांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. हे कधी कधी पुण्यास येऊनही राहत असत. गणपतराव रास्ते हे जमखंडीचे राहणारे. बळवंतराव वैद्य यांच्याजवळ हे पखवाज व तबला शिकले. तोंडाने बोल काढून मग ते बोल पखवाजात काढीत असत. त्यामुळे श्रोत्यांचे मनोरंजन उत्तम होई. शंकरभय्या हे पुण्याचे राहणारे. बळवंतराव वैद्य यांचा पुण्याला गायनवादनाचा समाज होता. तेथे हे मृदंग व तबला वाजविण्यास शिकले. बेलबाग देवस्थानात त्यांस नोकरी होती. अनेक गवयांना यांनी साथ करून नाव मिळविले होते. दादा लाडू व रुकडीकर यांची नावेही तबलावादनात प्रसिद्ध आहेत. नाटकात ते साथ करीत असत.
 तबलजींमध्ये सर्वांमध्ये अग्रगण्य म्हणजे अहमदजान थिरकवा हे होत. हे गंधर्व नाटक मंडळीत होते व तेथेच त्यांना अलौकिक कीर्ती मिळाली. असा तबलावादक पूर्वी कधी झाला नाही व पुढे होणार नाही, असे त्यांच्याविषयी गोविंदराव टेंबे म्हणत असत. पं. मालवीयांनीसुद्धा थिरकवांची प्रशंसा केली होती. बालगंधर्वाना ते साथ करीत असताना गंधर्वांच्या गाण्याला टाळ्या पडत, तशा कित्येक वेळा स्वतंत्रपणे थिरकवांच्या तबल्यालाही पडत. 'वाहवा अहंमदजान' असे म्हणून लोक त्यांना दाद देत. गंधर्व कंपनीत त्यांच्याच बरोबर कादरबक्ष हे सारंगिये होते. म्हणून त्यांची माहिती येथेच मुद्दाम देतो. त्यांच्या सारंगीला बेसूर असा कधी माहीतच नव्हता. त्यांचे सारंगीवरचे उच्चारण इतके विलक्षण होते की कित्येक वेळा गाण्यातील शब्दच उमटत आहेत असे श्रोत्यांना वाटे. बालगंधर्वानी अशी गुणी माणसे जोडली होती. थिरकवा व कादरबक्ष यांच्यावर त्यांची फार भिस्त होती.
 महाराष्ट्रीय संगीताचा इतिहास असा मोठा वैभवशाली आहे. शास्त्रीय संगीत, सिनेसंगीत, नाट्यसंगीत, वाद्यसंगीत इ. विविध शाखांत अग्रपूजेचा मान मिळविणारे कलाकार महाराष्ट्राने भारताला दिले आणि येथल्या श्रोत्यांनीही खरे रसिक श्रोते अशी कीर्ती परकीयांकडून मिळविली. आज पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, किशोरी आमोणकर, प्रभा अत्रे यांनी तीच संगीताची परंपरा पुढे चालविली आहे.