पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९७
महाराष्ट्रीयांची कलोपासना
 


सिनेसंगीत
 नाट्यसंगीतानंतर सिनेसंगीताचा विचार करावयाचा. सिनेमात दोनतीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाणे चालत नाही. त्यामुळे, हे गाणेच नव्हे, असे काही लोक म्हणतात. आणि त्यांच्या म्हणण्याला अर्थही आहे. कारण कोणताही राग दोनतीन मिनिटांत केव्हाही आळवता येणे शक्य नाही. पण दुसरी गोष्ट तितकीच खरी आहे की सिनेमाचे प्रेक्षक नाटकापेक्षा दसपटीने जास्त असल्यामुळे संगीताचा प्रसार नाटकापेक्षा सिनेमामुळे दसपटीने, शतपटीने जास्त झाला आहे. प्रारंभी पार्श्वगायनाची सोय नव्हती. तेव्हा नटनटी स्वतःच गाणी म्हणत. अशा नटनटींत शांता आपटे, शांता हुबळीकर, मीनाक्षी, दुर्गा खोटे, मास्टर विनायक, जोग हे प्रमुख होत. पुढे पार्श्वगायनाची सोय झाल्यामुळे नटी कोणतीही असली तरी लताबाई, आशाबाई, उषाबाई, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा यांसारख्या अव्वल दर्जाच्या गायिकांचे गायन सर्वांना नेहमी ऐकायला मिळू लागले. लताबाई मंगेशकर यांनी या क्षेत्रात जी कीर्ती मिळविली आहे तिला जगात क्वचितच कोठे तोड असेल. त्यांची कंठमाधुरी, त्यांचा भावनाविष्कार, त्यांच्या तानांच्या फेकी या ज्यांनी ऐकल्या नाहीत असा मनुष्य भारतात बहुधा सापडणारच नाही. मराठीप्रमाणेच हिंदी व इतर भाषांत त्या गात असल्यामुळे सर्व भारतभर त्यांची कीर्ती झाली आहे. त्यामुळे लताबाई या महाराष्ट्राचे अनन्यसाधारण असे भूषण झाल्या आहेत. या क्षेत्रात आशाबाई भोसले, उषाबाई मंगेशकर, सुमन कल्याणपूर यांनी लताबाईंच्या खालोखाल कार्य करून महाराष्ट्राला सर्व भारतात आणि इंग्लंड, अमेरिकेतही कीर्ती मिळवून दिली आहे.

वाद्यसंगीत
 हे सर्व कंठसंगीताविषयी झाले. आता वाद्यसंगीताचा विचार करून हे संगीत समालोचन पुरे करू.
 वाद्यसंगीत हे पुष्कळ वेळा कंठसंगीताची साथ म्हणून येत असले तरी त्याला स्वतंत्र अस्तित्व व महत्त्वही आहे, हे सनई, सतार, व्हायोलिन, तबला यांच्या स्वतंत्र मैफली होतात यावरून स्पष्ट दिसते.
 प्रथम सतारीचा महिमा पाहू. नारो आप्पाजी भावे, बाळाजीपंत अशी काही पेशवेकाळची नावे आढळतात. भावे नानासाहेब पेशवे यांच्या पदरी होते व बाळाजीपंत राघोबाजवळ होते. गेल्या म्हणजे एकोणिसाव्या शतकात बिच्चू खां यांचे नाव प्रसिद्धीस आले. उत्तर हिंदुस्थानातून येऊन हे सातारच्या महाराजांच्या आश्रयास राहिले होते. सातारचे विष्णुबुवा मटंगे हे बिच्चू खां यांचेच शिष्य होत. काही दिवसांनी पुण्याचे डॉ. विनायकराव लिमये यांनी त्यांना पुण्यास आणले व ते स्वतः खांसाहेबां जवळ सतार शिकले. प्रसिद्ध सतारिये अण्णा घारपुरे हे त्यांचेच शिष्य होते. डॉ.