पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६४८
 

(वृत्तपत्रातील) प्रचार झाला आहे, तेथे लोकांचे आंतर व्यवहारामध्ये व बाह्य व्यवहारामध्ये हित झाले आहे. यापासून बहुत वेळ विद्यांची वृद्धी झाली आहे. लोकांमध्ये नीती रूपास आली आहे. अलीकडे कित्येक देशांत धर्मरीती व राज्यरीती यांत जे चांगले व उपयोगी फेरफार झाले आहेत त्यांसही थोडेबहुत हे लेख उपयोगी पडले आहेत. बंगाल प्रांत इंग्रजांचे हाती जाऊन साठसत्तर वर्षेच झाली. परंतु तेवढ्यात तो आता निर्भयपणे स्वातंत्र्य भोगतो आणि तेथील लोकांस विद्याकलांचे विशेष ज्ञान होत आहे. सर्व हिंदुस्थानात जो अंधकार फार दिवस व्यापून राहिला होता तो जाण्यास आता प्रारंभ झाला आहे.'
 बाळशास्त्री हे मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करीत असत. गणित, ज्योतिष व भौतिक शास्त्र हे त्यांचे विषय होते. पण त्यांना ग्रीक, लॅटिन, इंग्लिश, फ्रेंच, आरबी, फार्शी, हिंदी, बंगाली, गुजराथी व कानडी इतक्या भाषांचे ज्ञान होते. शिक्षणक्षेत्रात काम करून प्राचीन शिलालेखांवर संशोधनात्मक लेखही त्यांनी लिहिलेले आहेत. रॉयल एशियाटिक सोसायटीचे नियतकालिक १८४१ पासून सुरू झाले. त्यात त्यांचे लेख येत असत. 'दर्पण' साप्ताहिक १८४० साली बंद पडले. तेव्हा 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू करून त्यांनी तोच उद्योग पुढे चालविला.
 यावरून ध्यानात येईल की धार्मिक, सामाजिक, राजकीय कोणतीही सुधारणा वा क्रांती असो, तिचा पाया भौतिक विद्या हा आहे, हे अगदी प्रारंभापासून येथल्या विद्वानांच्या मनावर ठसले होते आणि त्याच हेतूने प्रेरित होऊन त्यांनी आपले उद्योग सुरू केले होते.

लोकहितवादी
 या पाश्चात्य भौतिक विद्येचे दुसरे मोठे पुरस्कर्ते म्हणजे लोकहितवादी. अज्ञान ही हिंदुलोकांची, आणि ब्राह्मणांची महाव्याधी आहे, असे त्यांचे मत होते. त्यांची मने व बुद्धी सर्वस्वी पुराणात बुडालेली होती. विष्णू शेषावर निजतो, खांबातून नरसिंह निघाला, राहू-केतू चंद्रसूर्यांना ग्रासतात, हेच त्यांचे अजूनही ज्ञान आहे. जगाचा इतिहास, भूगोल, रसायन, गणित, शिल्प इ. शास्त्रांची त्यास काही कल्पना नाही. इंग्रजी ग्रंथात आहे काय दगड, असे ते म्हणतात. आणि विशेष नवल म्हणजे या अज्ञानातच त्यांस भूषण वाटते. लोकहितवादी म्हणतात, हे शास्त्री, भट, व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टीचे भरात आहेत. कोणी म्हणतो विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. ज्ञान म्हणजे काय हे त्यांस ठाऊकच नाही. इंग्लंडातील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस यांची राज्यक्रान्ती, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियांची वस्ती, लोकसत्तात्मक राज्य, या शब्दांचा अर्थही बहुतेक हिंदुलोकांस ठाऊक नसतो. तेव्हा हिंदू लोकांची