पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४१
प्रबोधनाच्या अभावी
 

शाहीची स्थापना करावयाची होती. हे फार मोठे आणि अत्यंत दुष्कर असे ध्येय होते. दीर्घ काळ स्थापन झालेल्या मुस्लिम सत्तेचा समूळ उच्छेद करावयाचा आणि पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे जे पाश्चात्य आक्रमक त्यांची आक्रमणे मोडून काढावयाची असे हे दुहेरी कार्य होते. वर सांगितल्याप्रमाणे धर्म, समाजरचना, अर्थव्यवस्था या क्षेत्रांत समूळ क्रांती केल्यावाचून, हिंदुसमाजाची पुनर्घटना केल्यावाचून, एवढ्या कार्यासाठी अवश्य ते कर्तृत्व त्यांच्या ठायी निर्माण होणे शक्यच नव्हते. त्या कर्तृत्वासाठी भौतिक विद्येची पाश्चात्यांपेक्षाही जास्त उपासना करून वरील विषयांवर शेकडो ग्रंथ येथे निर्माण व्हावयास हवे होते. पण यातल्या कशाचाही प्रयत्न वा विचारही न करता मराठे साम्राज्यविस्तार करू लागले. या वेळी मुस्लिम हे त्यांच्यापेक्षाही मागासलेले व कर्तृत्वशून्य झाले होते. त्यांच्या सत्तेचा उच्छेद करणे मराठ्यांना जमले. पण हिंदुपदपातशाहीसाठी अखिल हिंदुसमाज, आसेतुहिमाचल राहणारा हिंदुसमाज, संघटित करणे अवश्य होते. म्हणजे शतकानुशतके उराशी बाळगलेली समाजरचनेची, धर्माची मूलतत्त्वे समूळ बदलावयास हवी होती. पण असे काही मराठ्यांच्या स्वप्नातही नव्हते, राज्यकर्त्यांच्या नव्हते आणि शास्त्री पंडित, कवी, तत्त्ववेत्ते यांच्याही नव्हते. ते राज्यकर्त्यांपेक्षा जास्त मागासलेले होते. तेव्हा साम्राज्यविस्तार करून हिंदुपदपातशाहीची स्थापना करण्यात मराठ्यांना यश आले नाही, यात नवल वाटण्याजोगे काहीच नाही. ज्या पातळीवरून ते हा प्रयत्न करीत होते, तेथून तसे यश येणे शक्यच नव्हते. चवदाव्या पंधराव्या शतकापासून युरोपात जे प्रबोधन युग सुरू झाले, त्यामुळे युरोपीय राष्ट्रे समर्थ झाली. तसे प्रबोधन हिंदुस्थानात घडणे अवश्य होते. निदान अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याची आकांक्षा धरणाऱ्या मराठ्यांनी तरी महाराष्ट्रात ते घडवावयास हवे होते. पण याची त्यांना कल्पनाही नव्हती. अशा स्थितीत हिंदुस्थानातच काय, महाराष्ट्रात सुद्धा स्थिर सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य झाले नसते.


 ४१