पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९९
मराठेशाहीचा अंत
 

दिला. यामुळे गायकवाडांवर इंग्रजांची भयंकर मगरमिठी बसली. ती त्यांना दुःसह झाली. आपण खरेखुरे पेशव्यांचे नोकर ही त्यांना आता आठवण झाली. तेव्हा, आपल्याला या जाचातून सोडावावे अशा विनवण्या करण्यासाठी, त्याने आपले वकील पेशव्याकडे पाठविले. गायकवाडांकडे पेशव्याने या वेळी तीन कोटींची बाकी दाखविली आणि तिचा आधी फडशा करा असे बजावले !

इंग्रजी सत्ता
 याच वेळी गंगाधरशास्त्री पटवर्धन हा इंग्रजांचा हस्तक गायकवाडीत होता. तो वित्तंबातमी इंग्रजांस पोचवीत असे. त्यामुळे तो तेथे कोणालाच नको होता. म्हणून १८१४ साली त्याला हिशेबाची तडजोड करण्यासाठी गायकवाडाने, इंग्रजांच्या मार्फतीने, पुण्यास पाठविले. पण या वेळी पुण्यास पेशव्याच्या दरबारी त्रिंबकजी डेंगळे याचे फार मोठे प्रस्थ होते. त्याने कारस्थान करून पंढरपूरच्या देवळात गंगाधरशास्त्री याचा १८१५ साली खून करविला. अर्थात इंग्रज यामुळे अतिशय संतापून गेले आणि गायकवाड यांचा सर्व संबंध तोडून टाकून त्यांनी गायकवाडास सर्वस्वी आपल्या सत्तेखाली घेतले.

नागपूर - भोसले
 आता नागपूरची कथा. रघूजी भोसले (दुसरा) १८०४ साली पराभूत झाल्यावर देवगावचा तहा आटपून नागपुरास परत आला. नंतर पैका हवा म्हणून त्याने स्वतःच्या रयतेसच लुटून पैका उभा केला ! येथे एक ध्यानात ठेवले पाहिजे की पेशव्यासकट वरील सर्व सरदार या काळात स्वतःच्या प्रजेस वाटेल तशी लुटीत असत. इंग्रजांनी त्यांस बांधून टाकल्यामुळे पैसा मिळविण्याचा त्यांचा मुलूखगिरी हा मार्ग बंद झाला होता. तेव्हा स्वतःच्या प्रजेस व सावकार, सधन शेतकरी यांना लुटणे हा मार्ग त्यांनी पत्करला होता. पेंढारी लोकांना लुटीत ते निराळे. येथे धनीच तिला लुटीत असत. रघूजी १८१६ मध्ये मृत्यू पावला. तोपर्यंत त्याने इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली नव्हती. पण तो जाताच त्याचा पुतण्या अप्पासाहेब याने इंग्रजांकडे वशिला लावला आणि तैनाती फौजेची अट मान्य करून, स्वतः नागपूरचा कारभार मिळविला. त्या वेळी रघूजीचा मुलगा परसोजी अंथरुणास खिळला होता. त्याचा त्याने खून करविला आणि सरदारी मिळविली. त्यानंतर इंग्रजांची गरज नाही असे मानून, तो इंग्रजांविरुद्ध उठला. पण सीताबर्डीच्या लढाईत त्याचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांजवळ फक्त १४०० लष्कर होते. आणि आप्पासाहेबाजवळ २० हजार होते. पण पराभव त्याचाच झाला व पुन्हा तो इंग्रजांच्या स्वाधीन झाला. बंडखोरीची क्षमा करून रेसिडेंट जेंकिन्स याने पुन्हा त्यास सेना-साहेब-सुभा हे पद दिले. पण त्यानंतरही आप्पासाहेब स्वस्थ बसला नाही. गुप्तपणे त्याने बाजीरावाकडे वकील