पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९५
मराठेशाहीचा अंत
 

याच काळात मुंबईला अनेक मराठे इंग्रजांच्या सहवासात आलेले होते. जपानवर १८५४ साली परकीय संकट येताच, तेथील अनेक सरदार युरोपला गेले आणि येताना राष्ट्राभिमान आणि भौतिक विद्या आणून त्यांनी आपले राष्ट्र संघटित व बलशाली करून टाकले. तसे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथल्या कोणाही हिंदी माणसास वाटले नाही हे नियतीचे मोठे कोडे वाटते. तंजावरचा सरफोजी हा सवाई माधवरावाचा समकालीन व समवयस्क होता. इंग्रज शिक्षकांच्या हाताखाली त्याचे शिक्षण झाले होते. तो उत्तम इंग्रजी लिहीत असे. इतिहास, भूगोल, गणित या विषयांचा अभ्यास त्याने केला होता. यामुळे एक मोठे ग्रंथालय स्थापावे ही प्रेरणा त्यास झाली. कलकत्त्याला त्याच काळात राममोहन रॉय कार्य करीत होते. मुंबईला अशाच वृत्तीचे दहापाच जरी मराठे निघाले असते, आणि पुण्यास येऊन त्यांनी जपानप्रमाणे कार्य केले असते, तर त्याच वेळी लोकहितवादी, जोतिबा फुले यांसारखे पुरुष निर्माण झाले असते. लोकहितवादींनी लिहिलेच आहे की 'इंग्रजी जाणणारा एक जरी पंडित झाला असता, तरी राज्य न जाते.' त्याचा भावार्थ हाच आहे. पण सभोवार अवलोकन करून काही निष्कर्ष काढण्याचे सामर्थ्य या वेळी मराठ्यांच्या ठायी राहिले नव्हते. ही अधःपाताची अगदी परम सीमा होय !

प्रजेचीच लूट
 दुसरा बाजीराव पेशवेपदावर आल्यानंतर मराठी राज्याचा विचार त्याने एक क्षणही कधी केला नाही. नाचरंग, विलास हाच त्याचा मुख्य उद्योग असे. त्यासाठी पैसा हवा. म्हणून त्याने पटवर्धन, रास्ते, प्रतिनिधी इ. सरदारांचा छळ सुरू केला. राघोबाच्या विरुद्ध असलेल्या लोकांवर त्याला सूड उगवावयाचाच होता. तेव्हा त्याने तो उद्योग आरंभिला. शिवाय सरंजामपट्टी, वेतनपट्टी, सावकारपट्टी, संतोषपट्टी, अशा अनेक पट्ट्या त्याने लोकांवर बसविल्या व पैसा उकळला. या वेळी दौलतराव शिंदे फौजेसह पुण्यालाच होता. त्याच्या फौजेचा खर्चच दरमहा २५ लक्ष होता. तो पैसा आणावयाचा कोठून ? म्हणून त्याने अनेक वेळा पुणे लुटले. सावकारांच्या घरी खणत्या लावल्या. तापल्या तव्यावर उभे करणे, अंगाला पलिते लावणे, हे त्याचे पैसे मिळविण्याचे उपाय होते. त्याचा सासरा सर्जेराव घाटगे हा तर महाभयंकर होता. पुण्याला त्याने यमपुरीच केली. नानाजवळून पैसा काढावा म्हणून त्याने त्यालाही कैद केले. दहापाच लाख दिले. पण त्याला दोन कोटी हवे होते.

वसई
 याशिवाय, राजशासन असे सर्वस्वी नाहीसे झाल्यामुळे, त्या काळी, कोणीही बलदंड पुरुष हजार पाचशे लोक जमवी आणि गावेच्या गावे लुटी. पुढे पेंढारी जमात आली तिचीच ही पूर्वावृत्ती होय. यशवंतराव व विठोजी होळकर हे दोघे भाऊ तुकोजीचे