पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५८४
 

येणार असे पाहून, हेस्टिंग्ज याने तहाचे बोलणे महादजीशी सुरू केले. या तहालाच सालबाईचा तह म्हणतात (१७ मे १७८२). हा तह एकट्या महादजीशी झाला. कारण त्या वेळी तो माळव्यात होता. पण नानाने इंग्रजांविरुद्ध चौकडी उभी केली असल्यामुळे, त्याने तहावर लगेच सही केली नाही. पण १७८२ च्या अखेरीस हैदर मृत्यू पावल्यानंतर नानाने त्यावर सही केली. राघोबास मराठ्यांच्या ताब्यात द्यावे व फत्तेसिंग गायकवाडांचा इंग्रजांनी जिंकलेला मुलूख परत द्यावा, एवढ्या दोनच अटी या तहात मराठ्यांच्या फायद्याच्या होत्या. बाकी सर्व नुकसानच होते. साष्टी वगैरे बेटे इंग्रजांकडेच राहावयची होती. फत्तेसिंगाची मागली खंडणी मागावयाची नव्हती, इंग्रजांखेरीज इतर युरोपीय टोपीकरांस मराठ्यांनी आश्रय द्यावयाचा नाही असे कलम होते; असे सर्व नुकसानच होते. पण मराठ्यांतील दुही, फितुरी, नाना महादाजींचे वैमनस्य हे पाहता, झाले हेच पुष्कळ झाले, असे म्हणावे लागते. हेस्टिंजच्या भूलथापास न फसता बंगालवर चालून गेले असते तर त्यांनी सर्व बंगाल उद्ध्वस्त करून टाकला असता असे ग्रँट डफ यानेच म्हटले आहे. तसे झाले असते तर इंग्रजी राज्याचा पायाच निखळला असता. पण हे शक्य नव्हते. भोसले फितला नसता तर दुसरा कोणी फितला असता. पुढे हेच होत गेले, म्हणून तर राज्य बुडाले. 'हिंदुस्थान इंग्रजांनी घेतला नसता तर फ्रेंचांनी घेतला असता,' असे खरे शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यातील भावार्थ हाच आहे. राष्ट्रभावनेच्या अभावी, येथे नाही तेथे, तेथे नाही तर आणखी कोठे, फूट, फितुरी ही अटळच होती. आणि तीमुळे येणारा राज्यनाश हाही अटळ होता. सालबाईचा तह ही केवळ त्याची नांदी होती.
 सालबाईचा तह १७८२ साली झाला. त्यानंतर १७९५ पर्यंतच्या तीन महत्त्वाच्या घटनांचे विवेचन करून हा लेख संपवायचा आहे. त्या तीन घटना म्हणजे महादजीचे उत्तरेतील कार्य, टिपूवरील स्वाऱ्या आणि निजामाशी झालेली खर्ड्याची लढाई या होत.

महादजी
 प्रथम महादजीच्या कार्याचा विचार करू. महादजी शिंदे हा अत्यंत शूर, धैर्यशील, पराक्रमी, कर्तृत्ववान, मुत्सद्दी, धोरणी असा होता, याविषयी सर्व इतिहास पंडितांचे एकमत आहे. त्याची स्वामीनिष्ठा अटळ होती. आणि नाना फडणिसाशी त्याचे वैमनस्य होते तरी, त्याने ते विकोपाला नेऊन, राज्याचा घात कधी केला नाही. महादजी असा अनेक गुणांनी संपन्न होता यात वाद नाही. पण येथे मराठयांचा उत्कर्ष आणि हिंदुपदपातशाही या दृष्टीने आपल्याला त्याच्या कार्याचा विचार करावयाचा आहे.
 दिल्लीचा बादशहा ताब्यात घेणे, त्याचे संरक्षण करणे हे मराठ्यांचे फार मोठे ध्येय होते. त्याचे मुखत्यार होऊन सर्व हिंदुस्थान ताब्यात आणावयाचा, असा त्यांचा मनोदय होता. त्यामुळेच महादजीने गोइद, ग्वाल्हेर ही प्रारंभीची प्रकरणे आटपताच