पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५७२
 

स्थानात एकही नव्हता, असे म्हटले तरी चालेल. पेशव्यांची राजधानी पुणे ही असताना त्या शहरावर सुद्धा अनेक वेळा असा प्रसंग येत असे. मग इतर शहरांची व गावांची आणि खेड्यांची कथा काय ? शत्रूचा प्रदेश फौजा उद्ध्वस्त करीत, एवढेच नव्हे तर स्वतःच्या मुलखात सुद्धा त्यांचा उपद्रव असे. थोरात, गायकवाड, जाधव, राघोबा यांनी आपलाच मुलूख लुटल्याच्या हकीकती इतिहास नित्य देतो. मराठ्यांनी निर्वेध साम्राज्यसत्ता दक्षिणेत स्थापिली असती तर या भयानक आपत्तीतून दक्षिणेतली प्रजा तरी सोडविण्याचे श्रेय त्यांना मिळाले असते, आणि मग त्यांचे साम्राज्य लोकांनी आनंदाने मान्य केले असते.

फक्त मुलूखगिरी
 सत्ताधाऱ्यांना व प्रजेला असे स्वास्थ्य मिळाले असते तर, युद्धाखेरीज राज्यकर्त्यांना काही निराळा उद्योग असतो, हे मराठ्यांच्या ध्यानात आले असते. शेती, व्यापार आणि कारागिरी हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा, म्हणूनच अंतिमतः सर्व जीवनाचा पाया होय. पण फौजांच्या धामधुमीत पहिला तडाखा बसतो तो यांना ! उभी शेते शिपाई कापून नेत, शेतात घोडे घालीत, गवताच्या गंजी त्यांच्या जनावरासाठी लुटून नेत, लमाणांचे तांडे दिसताच त्यांचे सर्वस्व हरण करीत आणि घरेदारे उद्ध्वस्त करून लाकूडफाटा, घरावरची गवते हे सर्व छावणीसाठी पळवून नेत. अशा स्थितीत कसली शेती आणि कसला व्यापार ! विजयनगरच्या सत्ताधीशांना स्वास्थ्य होते. त्यामुळे त्यांनी कालव्यांचे जाळे करून टाकले होते. मराठ्यांनी एक तरी नवा कालवा किंवा शेतीसाठी नवे धरण बांधले का ? आपल्या देशात अमुक माल नाही, तेव्हा तो पैदा करण्यासाठी कारागिरांना उत्तेजन दिले काय ? द्रव्यसाह्य केले काय ? त्यांना हे करण्याला वेळच नव्हता. कारण मुलुखगिरीवाचून त्यांचा राजकीय प्रपंच भागतच नसे. मग इतर उद्योगांकडे केव्हा लक्ष द्यावयाचे ?
 दक्षिण निर्वेध झाली असती तर इंग्रज आणि फ्रेंच यांचा उदय येथे झालाच नसता. ते व्यापारी म्हणून आले असते. आणि मराठ्यांना स्वास्थ्य असते तर त्यांच्यांशी येथल्या व्यापाऱ्यांची सांगड घालून त्यांना आपल्या सर्व व्यापाराला निराळेच वळण लावणे शक्य झाले असते. आणि मग इंग्रज, फ्रेंच सत्ताधारी म्हणून तर नाहीच, पण व्यापारी म्हणून सुद्धा वरचढ होऊ शकले नसते. मग येथल्या व्यापाऱ्यांना बहुत परदेशी जाण्याची आकांक्षा निर्माण झाली असती ! भारतात ही गोष्ट काही नवीन नव्हती. दहाव्या शतकापर्यंत सर्व जगभर येथले व्यापारी हिंडत असत. त्यानंतर सिंधुबंदी, रोटीबंदी ही बंधने धर्मशास्त्राने आणली आणि आचार्य व संत यांनी ऐहिक प्रपंचाचे विदारण करून टाकले. आणि सर्व लोक निवृत्त झाले ! दीर्घकाळ स्वास्थ्य मिळते, आणि इंग्रज- फ्रेंचांशी परिचय त्या दृष्टीने झाला असता, तर कदाचित ती बंधने तोडून लोक पुन्हा प्रवृत्त झाले असते. पण इतकी लांबची झेप सोडून दिली