पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५७०
 

ठरल्यासारखे झाले होते. निरनिराळ्या मराठा सरदारांना त्यांनी भिन्नभिन्न प्रदेश वाटून दिले आणि तेथे स्वतंत्र फौजा ठेवून त्या प्रांतांची चौथाई त्यांनी वसूल करावयाची आणि तेथे बंदोबस्त राखावयाचा, असे ठरवून दिले होते. त्यामुळे या राज्यात एकमुखी सत्ता अस्तित्वात येणे शक्य नाही, हे तेव्हाच ठरून गेले होते. त्यातून स्वतः शाहू छत्रपती स्वारीवर राहात असते, युद्धाचे नेतृत्व करीत असते, तर बरीच विघटना टळली असती. पण त्यांच्या ठायी ते कर्तृत्व नव्हते. अष्टप्रधानांनी आपल्याला वाटून दिलेल्या प्रांतात पेशव्यांप्रमाणे पराक्रम केला असता, तर विघटना टळली नसती, पण साम्राज्याला स्थैर्य जास्त आले असते. कारण त्यामुळे अनेक कर्ते पुरुष, सेनापती, प्रशासक, फडणीस राज्याला लाभले असते. पण तेही दुर्दैवाने झाले नाही. त्यामुळे एकट्या पेशव्यांवर सर्व भार पडला. तोही उचलण्याइतके कर्तृत्व त्यांजपाशी होते. पण इतर प्रधान व सरदार यांनी त्यांचा मत्सर व वैर करण्याचे व्रत पिढ्यान् पिढ्या चालविले. त्यामुळे त्यांच्याही कर्तृत्वाला मर्यादा पडल्या. परकीयांप्रमाणेच त्यांना स्वकीयांशीही लढावे लागले. त्यात त्यांची फार शक्ती खर्च झाली. अशा सर्व परिस्थितीमुळे मराठी साम्राज्याला वर अनेक ठिकाणी सांगितल्याप्रमाणे विचित्र रूप आले. जेथे मराठ्यांची फौज उभी असेल तेथे त्यांची सत्ता ! त्यांची पाठ वळताच पुन्हा पहिली स्थिती ! माधवरावाच्या कारकीर्दीत हेच झाले. निजाम, हैदर आणि उत्तरेकडचे नजीबखान, बंग, सुजाउद्दौला, जाट, रजपूत यांना मराठ्यांनी नमविले, जिंकले. पण तेथे तेथे मिळविलेले विजय अबाधित राखण्याचे सामर्थ्य मराठ्यांत नव्हतेच. कारण हा सर्व भार संभाळण्यासाठी याच्या दसपट शतपट तरी कर्ते पुरुष पाहिजे होते. कर्तृत्व याचा अर्थ वर अनेक ठिकाणी स्पष्ट केला आहे. केवळ रणातला पराक्रम, युद्धातली वीरश्री एवढेच कर्तृत्व नव्हे. साम्राज्य चालविण्यास इतर अनेक प्रकारचे कर्तृत्व आणि दुही, फितुरी, राष्ट्रद्रोह यांचा अभाव, शिस्तपालन हे सर्व अवश्य असते. पण हे गुण मराठ्यांना कधीच जोपासता आले नाहीत. म्हणून त्यांच्या साम्राज्याला स्थैर्य कसे ते आलेच नाही. त्यामुळेच मागल्या प्रकरणाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न मनात येतो. मराठे नर्मदेच्या वर गेलेच नसते तर ?

एक प्रश्न
 निजामाचा पुरा बंदोबस्त करावयाचा सोडून बाजीराव उत्तरेत प्रथम माळव्यात आणि मग दिल्लीवर गेला यासाठी त्याला अनेक इतिहासपंडितांनी दोष दिला आहे. पण मराठे नर्मदेच्या वर मुळीच गेले नसते तर काय झाले असते. याची सविस्तर चिकित्सा कोणी केलेली नाही. ती येथे थोडक्यात करावयाचा विचार आहे.

निर्वेध दक्षिण
 पालखेडला निजामाचा पराभव केल्यानंतर, त्याची पुरी विश्रांती करावी, असा