पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०९
पेशवाईचा उदय
 

 बाळाजी विश्वनाथ हा १६९९ सालापासून सात आठ वर्षे पुणे प्रांताचा सुभेदार म्हणून काम करीत होता. त्याच्या आधी दहापंधरा वर्षे तरी तो श्रीवर्धनहून वरघाटी आला असला पाहिजे. सेनापती धनाजी जाधवाच्या हाताखाली त्याने कारभारी (कारकून) म्हणूनही काम केले होते. शाहूराजे आणि येसूबाई मोगली कैदेत असताना त्यांची देखभाल नीट करण्याची कसोशी बाळाजी करीत असे. अनेक मोगल सरदारांशी त्याच्या ओळखी होत्या. त्यांच्या मार्फत तो आपली कामे करून घेत असे. पुणे प्रांतीचा सुभेदार असताना वसूल, न्यायनिवाडे, देवस्थानची इनामे, आणि क्वचित युद्धप्रसंग ही बहुविध कामे तो करीत असे. त्यामुळे अष्टप्रधान व इतर मराठा सरदार यांच्याशी त्याचा उत्तम परिचय होत असे.
 शाहूराजे कैदेत असताना बाळाजीची ही कर्तबगारी पहात होते. ज्योत्याजी केसकर, बंकी गायकवाड इ. मध्यस्थांमार्फत त्यांचा त्याच्याशी संबंधही येत असे. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांनी हा माणूस हेरून ठेवला असला पाहिजे. पुढे खेडच्या लढाईच्या आधी ताराबाईच्या पक्षाच्या अनेक असामींची मने त्याने शाहूपक्षाला वळविल्याचे त्यांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे राज्याभिषेक होताच, त्यांनी बाळाजीला सेनाकर्ते हे पद देऊन, पैसा जमवून सेना उभारण्याचे अत्यंत जबाबदारीचे व जोखमीचे काम त्याच्याकडे दिले. बाळाजीच्या कर्तृत्वाच्या खऱ्या विकासाला तेथूनच प्रारंभ झाला आणि महाराष्ट्र राज्य हे ध्येय डोळ्यांपुढे बाळगून, शाहू छत्रपतींच्या ठायी अचल निष्ठा ठेवून, त्याने अखेरपर्यंत कार्य केल्यामुळे त्याला मराठ्यांच्या राज्यरक्षणाचे अवघड कार्य करता आले.

इतर सरदार
 वास्तविक त्या वेळी रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, शंकराजी नारायण, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, रावरंभा निंबाळकर, कृष्णराव खटावकर, हिंदुराव घोरपडे, खंडेराव दाभाडे, दामाजी थोरात असे अनेक मोठे कर्ते पुरुष स्वराज्यात होते. पण स्वराज्य हा ध्येयवाद, अचल निष्ठा आणि संघटनविद्या या गुणांत ते या ना त्या कारणाने उणे पडले. आणि त्यांचे कर्तृत्व वाया गेले. ते दुर्मिळ गुण बाळाजीने प्रगट केल्यामुळेच पुढल्या मराठी वैभवाचा पाया घातला गेला.

द्विधा मन
 रामचंद्रपंतांच्या अलौकिक कर्तृत्वाचे वर्णन मागे केलेलेच आहे. ताराबाईंनी १७०० साली शाहूविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्याचे मन द्विधा झाले. आणि त्याचे कर्तृत्व ऱ्हास पावू लागले. शाहू सुटून आल्यावर ताराबाईंनी सर्व मोठमोठ्या सरदारांकडून दूध- भातावर हात ठेवून एकनिष्ठेच्या शपथा घेवविल्या. मनातून ताराबाईवर निष्ठा नसताना अमात्याने ती शपथ घेतली. त्यामुळे तो जास्त खालावला. त्यातच त्याने शाहू-