पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५०६
 

त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचे जे उत्स्फूर्त स्वागत झाले त्यावरूनच त्यांचे आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरून गेले. आत्मबलिदान करणाऱ्या शंभुछत्रपतींचा हा मुलगा आहे, हाच खरा आपला राजा आहे, कैदेत त्याचे फार हाल झाले आहेत, त्याची आता आपण भरपाई केली पाहिजे, आपल्या निष्ठा त्याच्या चरणी वाहिल्या पाहिजेत, अशीच महाराष्ट्रात सर्वत्र भावना होती. परसोजी व कान्होजी भोसले, मानसिंग मोरे, अमृतराव कदमबांडे, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, केसो चिमल पिंगळे, हणमंते मंडळी, रायाजी, कृष्णाजी प्रभू, बोकील, पुरंदरे हे सर्व त्यांना मिळाले. पुढे ताराबाईने आणि वर निर्देशिलेल्या मराठा सरदारांनी द्वैत माजविले, त्यामुळे शाहूराजांना आपले आसन स्थिर करण्यास अतिशय प्रयास पडले, हे खरे. पण त्यातून निभावून ते स्थिरपद झाले ते त्यांच्या पाठीशी ही जी सर्व महाराष्ट्राची पुण्याई उभी राहिली तिच्यामुळेच होय यात शंका नाही.

दोन पक्ष
 शाहू राजे दक्षिणेत आल्यावर त्यांनी ताराबाईंना पत्र पाठवून कळविले की 'आम्ही स्वदेशी आलो आहोत, आता आम्ही राज्य करू, आपला आशीर्वाद असावा.' पण हे न मानता शाहूराजांचा सर्वतोपरी नायनाट करण्याचा उद्योग त्यांनी आरंभिला. त्यांनी प्रथम, हा शाहू खरा नव्हे, तोतया आहे, असा पुकारा केला. पण हे टिकण्याजोगे नव्हते. राजांना शेकडो मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या छावणीत ते असतानाही, अनेक वेळा स्वतः पाहिले होते. त्यामुळे ताराबाईचा पुकारा कोणीच मानला नाही. मग त्यांनी दुसरा मुद्दा मांडला. शंभूराजांनी राज्य चालविले ते राजाराम महाराजांनी रक्षिले. तेव्हा त्यांच्याच मुलाचा गादीवर हक्क आहे. तात्त्विक दृष्टीने या मुद्दयाला काहीतरी अर्थ होता. पण व्यवहारात मुळीच नव्हता. कारण राजारामांचा मुलगा धाकटा शिवाजी हा अगदीच नाकर्ता होता. त्याचे वागणे पुष्कळ वेळा वेडसरच असे. १७१४ साली ताराबाईंना व त्याला, त्याचा सावत्र भाऊ, राजसबाईचा मुलगा संभाजी याने कैदेत डांबले, तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याच्या अंगी काही कर्तृत्व असते तर त्याने त्याच्या पक्षाच्या मराठा सरदारांच्या मदतीने आकाशपाताळ एक करून, शाहू व संभाजी यांना बाजूस सारून, स्वतः राज्य घेतले असते. पण तसे त्याने काहीच केले नाही. १७१४ पासून बारा वर्षे कैदेत राहून १७२६ साली तो मृत्यू पावला. अंगात पाणी असते तर कैदेतून त्याने अनेक उलाढाली केल्या असत्या व तो निसटून तरी गेला असता. पण त्याच्या ठायी हे पौरुष नव्हतेच. तेव्हा ताराबाईंचा पक्ष खरा की शाहू राजांचा खरा या वादात काडीचाही अर्थ नाही. शाहू राजे हेच एकमेव मराठी राज्याचे धनी होते, आणि स्वार्थी मराठा सरदार वगळता अखिल महाराष्ट्राने तोच निर्णय ते परत येताक्षणीच दिला.