पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४५८
 

'ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज', 'नोव्हम और गॅनम्' इ. ग्रंथ लिहून नव्या बौद्धिक संस्कृतीची प्रस्थापना केली. सत्यदेवता ही बायबलची कन्या नसून मानवी प्रज्ञेची कन्या आहे, असे त्याचे तत्त्वज्ञान होते.
 या शास्त्रज्ञांनी सूर्य, पृथ्वी, तारे यांचे जे रूप लोकांना प्रत्यक्ष दाखविले ते बायबलने वर्णन केलेल्या रूपापेक्षा अगदी निराळे होते; त्यामुळे बायबल, पोप, धर्मगुरू यांच्यावरील लोकांच्या अंधश्रद्धेला तडा गेला आणि त्या प्रमाणात त्यांची बुद्धी स्वतंत्र झाली.

जगप्रवास
 त्या युगातल्या जगप्रवासी लोकांनी त्या श्रद्धेला असाच आणखी एक धक्का दिला. मार्को पोलो हा प्रवासी तेराव्या शतकात आशिया खंड पाहून इटलीला परत गेला. त्याचा ग्रंथ वाचून पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री याच्या चित्तात समुद्रपर्यटनाची प्रबळ आकांक्षा निर्माण झाली. पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेला वळसा घालण्याचा प्रयत्न करू लागले. १४९२ साली कोलंबस अमेरिकेला जाऊन आला आणि १४९८ साली वास्को द गामा हिंदुस्थानापर्यंत पोचला. मॅगेलनच्या बोटींनी याच सुमारास पृथ्वीप्रदक्षिणा पुरी केली. यामुळे पृथ्वी, समुद्र, पाताळ, यासंबंधीचे बायबलचे सिद्धांत पार उद्ध्वस्त झाले. पोपच्या धर्मसत्तेला मोठा हादरा बसला. मानवी मन मुक्त होऊ लागले.

धर्मसत्तेशी लढा
 आकाशस्थ ग्रहगोलतारे आणि पृथ्वीवरचे भूखंड आणि समुद्र यांचे हे जे संशोधक त्यांनी चालविलेला लढा हा अप्रत्यक्ष लढा होता. त्यांच्या साथीला पोपच्या अंध, हेकट, दुराग्रही, भ्रष्ट, आणि उन्मत्त सत्तेला आव्हान देऊन पोपशी प्रत्यक्ष लढा करणारे थोर पुरुषही याच सुमारास उभे राहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. जॉन वायक्लिफ हा अशा लोकांत अग्रगण्य होता. मनुष्य व परमेश्वर यांमध्ये मध्यस्थ म्हणून पोप, कार्डिनल, बिशप, प्रीस्ट अशा धर्माचार्यांची मुळीच गरज नाही, मनुष्याने स्वतंत्रपणे भक्ती, प्रार्थना, नामस्मरण करून मोक्ष मिळवावा, असे तो निर्भयपणे प्रतिपादन करीत असे. बायबल हा ग्रंथ त्या वेळी लॅटिन भाषेत होता. त्याचे पठण व अध्ययन लोकांनी स्वतः करण्यास पोपची सक्त मनाई होती. अशा लोकांना तो देहदंडाची शिक्षा सांगे. आपल्याकडे शूद्रांना वेदपठणासन बंदी होती. तसाच हा प्रकार होता. वायक्लिफने पोपचा हा दण्डक उपमर्दून बायबलचे इंग्रजीत भाषांतर केले, त्याच्या हस्तलिखित प्रती देशभर पसरून दिल्या आणि बायबल पठणाचा प्रत्येकास अधिकार आहे असा सिद्धांत मांडला. शिवाय पोपचे ऐहिक ऐश्वर्य व त्याचे भोगविलास यांवरही त्याने कडक टीका केली. बोहेमियातील प्रागच्या विद्यापीठातील प्राध्यापक जॉन हस याने वायक्लिफची हीच परंपरा पुढे चालविली. पोपने