पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५७
यशापयश-मीमांसा
 


मोठा प्रश्न
 शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्रनिष्ठा निर्माण केली, त्यांनी लोकशाहीचा पाया घातला, असे वर म्हटले आहे. अनेक इतिहासपंडितांनीही हा विचार मांडलेला आहे. त्यावरून मग मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. पश्चिम युरोपात चौदाव्या पंधराव्या शतकात याच निष्ठांचा उदय झाला होता आणि त्यामुळे हळूहळू तेथील देश, विशेषतः इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड हे देश समृद्ध, बलाढ्य झाले, आणि त्यांनी सर्व जगावर आपले प्रभुत्व स्थापन केले. तसे महाराष्ट्रात व भारतातील इतर देशांत का झाले नाही ?

प्रबोधन नाही
 याचे उत्तर असे की पश्चिम युरोपात त्या काळात जे समाजप्रबोधन झाले ते भारतात कोणत्याही प्रांतात झाले नाही. छत्रपतींनी कार्य केले त्यामागे प्रबोधनाची काही काही तत्त्वे होती. पण त्या तत्त्वांचे विवेचन करून, त्यावर ग्रंथ लिहून त्यांचा समाजात प्रसार करण्याचे जे कार्य शास्त्रीपंडितांनी करावयास हवे, ते येथे कोणीच केले नाही. एकटा एक नेता, तो महापुरुष असला तरी, शिवछत्रपतींनी जे कार्य केले त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. त्यांनी जे केले त्याच्या शतांशमुद्धा युरोपातल्या त्या वेळच्या राजांना करता आले नव्हते. राष्ट्रभावना, लोकसत्ता, धर्मसुधारणा, आर्थिक क्रांती या गोष्टी एका माणसाच्या नव्हेतच. शेकडो, हजारो पंडित, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, प्रवचनकार, वक्ते, कार्यकर्ते यांनी तनमनधन अर्पून हे कार्य करणे अवश्य असते. हा व्याप केवढा प्रचंड आहे याची सम्यक कल्पना यावी म्हणून पश्चिम युरोपातल्या समाजप्रबोधनाची थोडी माहिती देतो.

शास्त्रसंशोधन
  प्रबोधनाच्या श्रेयाचा फार मोठा वाटा त्या काळात उदयास आलेल्या शास्त्रज्ञांचा आहे. रॉजर बेकन हा तेराव्या शतकातला शास्त्रज्ञ. हा फ्रॅन्सिस्कन पंथाचा धर्मगुरू होता. तरी रूढ धर्ममते त्याला मान्य नव्हती. अवलोकन व प्रयोग यांनी स्वतंत्र बुद्धीने सत्याचा शोध घ्यावा, अशी ज्ञानपद्धती त्याने उपदेशिली. चाक्षुप विज्ञान, परावर्तनाचे नियम, इंद्रधनुष्य, गुरुदर्शक भिंग हे त्याच्या संशोधनाचे विषय होते. त्याची मते पोपच्या धर्मपीठाला पाखंडी वाटत. म्हणून त्याने या थोर शास्त्रज्ञाला चोवीस वर्षे कारागृहात बद्ध करून ठेविले होते. तरीही शास्त्रीय सत्यावरील आपली निष्ठा त्याने ढळू दिली नाही. यामुळेच हळूहळू युरोपात बुद्धि-स्वातंत्र्याचा परिपोष झाला. हे भारतात घडले नाही. रॉजर बेकननंतर कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन या थोर शास्त्रज्ञांनी तीच परंपरा पुढे चालविली. आणि फ्रॅन्सिस बेकन याने,