पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२३.
यशापयश-मीमांसा
 



 महाराष्ट्र-संस्कृतीच्या दृष्टीने आपण शिवछपतींच्या कार्याचे अवलोकन करीत आहोत. त्यांनी केलेले धर्मपरिवर्तन, त्यांची नवी अर्थव्यवस्था, त्यांचे राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न आणि त्यांची युद्धविद्या यांचे विवेचन येथवर केले. आता त्यांच्या प्रशासन- पद्धतीचे म्हणजेच राज्यकारभार- पद्धतीचे स्वरूप पहावयाचे आहे; आणि मग समाज- प्रबोधनाच्या दृष्टीने या सर्वाची चिकित्सा करावयाची आहे.

अष्टप्रधानमंडळ
 त्यांच्या प्रशासन पद्धतीतली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अष्टप्रधान- मंडळ ही होय. भारतात प्राचीन काळी राजाचे प्रधानमंडळ ही संस्था दीर्घकालपर्यंत रूढ झालेली होती. रामायण, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, मनुस्मृती, शुक्रनीती या ग्रंथांत या प्रधानमंडळाचे सविस्तर वर्णन आहे आणि त्याचे महत्त्वही विशद केलेले आहे. त्या प्राचीन परंपरेचेच छत्रपतींनी अनुकरण केले हे उघड आहे. अलीकडे याविषयी काही वाद निर्माण झाले आहेत. मुस्लिमांचे अनुकरण करून महाराजांनी आपले अष्टप्रधान मंडळ बनविले असे कोणी म्हणतात. स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नास लागताच त्यांनी काही प्रधानांची नेमणूक केली होती आणि त्यांना पेशवा, डबीर, सुरनीस, वाकनीस, सरनोबत अशी फारशी नावे त्यांनी दिली होती. त्यामुळे मुस्लिमांच्या अनुकरणाने त्यांनी अष्टप्रधान मंडळ केले कसा कोणाचा तरी समज झाला असावा. पण तो केवळ गैरसमज होय, हे प्राचीन ग्रंथांतून या परंपरेचे जे वर्णन आहे, त्यावरून स्पष्ट होईल. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी ही नावेही काढून टाकली