पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४५०
 


नवी पद्धत
 पायदळ, घोडदळ, नौदल आणि गडकोट असे महाराजांचे चतुरंग दल होते. पहिल्या तीन अंगांची बांधणी कशी होती ते वर सांगितले. गडकोटांची व्यवस्थाही अशीच आखीवरेखीव होती, मुख्य गडकरी किल्लेदार त्याला हवालदार म्हणत. तो नेहमी मराठा असे. दुसरा अधिकारी सबनीस. मुलकी जमाखर्च तो पाही. हा जातीने ब्राह्मण असे. कारखानीस हा तिसरा अधिकारी. किल्ल्यावरील घासदाणा, दारूगोळा यांचा पुरवठा आणि तटबंदीची डागडुजी हे काम त्याच्याकडे असे- हा जातीने प्रभू असे. सभासद म्हणतो असे तीन जातीचे अधिकारी 'एकास एक प्रतिमेळ ठेवावे. एका हवालदाराचे हाती किल्ला नाही. जो कारभार करणे तो तीघानी एका प्रतीचा करावा. ये रीतीने बंदोबस्तीने गडकोटाचे मामले केले. नवी पद्धत घातली.'
 लष्करातील शिपायापासून सरनौबतापर्यंत सर्वांना रोख पगार असे आणि तो भरपूर असे. डॉ. सेन यांनी त्या वेळचे मोगल, आदिलशाही लप्कर आणि पोर्तुगीज व इंग्रज लष्कर यांची तुलना करून म्हटले आहे की मराठा लष्करातील पगार निश्चितच जास्त असत.

हद्द झाली
 शिवछत्रपतींची युद्धविद्या ही अशी होती. त्यांनी ध्येयवादाचे संस्कार करून मराठा समाजात नवचैतन्य निर्माण केले. पायदळ, घोडदळ, नौदल आणि किल्ले असे चतुरंग दल उभारले. आणि वृकयुद्धपद्धतीचा अवलंब करून आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल यांच्या सत्ता पायासकट हादरून टाकल्या. प्रारंभी शिवाजीला नेस्तनाबूत करण्याच्या वल्गना या सत्ता करीत असत. पण अखेरीस त्या शिवछत्रपतींना खंडणी देऊ लागल्या. आदिलशहा आणि कुतुबशहा तर प्रत्यक्षच खंडणी देऊ लागले. मोगलांनी खंडणी दिली नाही. पण ती वेळ येणार ही धास्ती त्यांच्या मनात निर्माण झाली. महाराज सिंहासनारूढ झाल्याची बातमी दिल्लीस पोचली, तेव्हा औरंगजेबाची स्थिती काय झाली ? सभासद लिहितो, 'पातशहा तक्तावरून उतरून अंतःपुरात गेले आणि दोन्ही हात भुईस घासून, आपले देवाचे नाव घेऊन, परम खेद केला. दोन दिवस अन्न, उदक घेतले नाही. आणि बोलले की 'खुदाने मुसलमानांची पादशाही दूर करून तक्त बुडवून मराठीयास तक्त दिले. आता हद्द जाली !' विजापूरचे पादशहास व भागापूरचे पादशहास असा खेद झाला. रूमशाम, इराण, दुराण व दर्यातील पातशहा खबर कळून मनात खेद करू लागले. ये जातीचे वर्तमान जाहाले.'
 या शेवटच्या वाक्यात छत्रपतींच्या अवतारकार्याचे स्वरूप नेमके सांगितलेले आहे. त्यांनी प्रथम महाभारतप्रणीत धर्माचे पुनरुज्जीवन केले, अर्थव्यवस्थेत फार मोठे परिवर्तन घडवून आणले, मराठ्यांना राष्ट्रतत्त्वावर संघटित केले आणि त्यांना नवी