पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४०८
 

मोठी सभा ती देशक होय. या सभांना पुन्हा पहिले अधिकार देऊन आणि त्यांच्यावर आपले सुभेदार व इतर अधिकारी यांच्या मार्फत सक्त नजर ठेवून शिवछत्रपतींनी सर्व प्रांताचे पुनर्वसन घडवून आणले व या अर्थव्यवस्थेचा मूलाधार जो शेतकरी त्याला नवी संजीवनी दिली. प्रभानवल्लीच्या सुभेदारास १६७६ साली महाराजांनी एक पत्र लिहिले. त्याचा भावार्थ पुढे देतो. त्यावरून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची कल्पना स्पष्ट होईल. 'इमाने इतबारे साहेब काम करावे. येक भाजीच्या देठासही मन न दाखविता रास्त वर्तणे, शेतीची लावणी, संचणी, उगवणी सर्व ठीक करून, रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणास येई, ते करणे. रयतेवरी काडीचे जाल (जुलूम) केलिया साहेब तुजवरी राजी नाहीत यैसे बरे समजणे. रयतेस तवाना (ताजे तवाने) करावे आणि कीर्द करवावी हे गोष्टीस इलाज साहेबी तुज फर्माविला आहे की कष्ट करून गावाचा गाव फिरावे. गावचे कुनबी गोला करावे. कुणब्यांजवळ सेत कराया बैल, दाणे, संच, असीला (असला) तर बरेच जाले. पण नसेल तर त्यास बैलाचे दाण्याचे पैके रोख द्यावे व पेरजर (पुढील साल) मूळ मुदल फक्त वाढी- दिढी न करता (व्याज वगैरे न घेता) हे पैके वसूल करावे. मात्र कुणब्याची तवानगी राहिली पाहिजे. नाही तर वसूल करू नये. या कलमास जरी दोन लाखपर्यंत खर्च करशील आणि कुणबियाकुनबियाची खबर घेऊन त्याला तवानगी येती ते करून कीर्द करशील आणि पडजमीन लाऊन दस्त (महसूल) जाजती (जास्त) करशील तरी साहेबा कबूल आहे. आकलेने व तजविजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे.'

दुहेरी कैची
 शिवकालीन पत्रसारसंग्रह, शिवचरित्रसाहित्य यांतून त्या काळची अनेक पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांवरून हे स्पष्ट होते की देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी यांनी शेतकऱ्यायाची सर्व प्रकारची काळजी वाहिली पाहिजे आणि जमिनीचे उत्पन्न वाढवून त्या मार्गाने सरकारी महसूल वाढविला पाहिजे असा सक्त दंडक महाराजांनी घालून दिला होता. देशमुख, देशपांडे यांना वतने दिली, इनामे दिली ती लढाईत पराक्रम करण्यासाठी तर आहेतच, पण शेतकऱ्याचे संरक्षण करणे, त्याला संभाळणे, त्याला सर्वतोपरी साह्य करून जमिनीचे उत्पन्न वाढवून परगण्यात समृद्धी निर्माण करणे हेही वतनदारांचे कर्तव्य आहे. ही नवी समजावणी छत्रपतींनी त्या वतनदारांना दिली आणि वतनदारांनी, देशमुखांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी म्हणून त्यांना महाराजांनी दुहेरी कैचीत धरले होते. वरून सरकारी अधिकारी त्यांवर सक्त नजर ठेवीत आणि रयतेकडून गोतसभा जागरूक असे. यासाठीच त्या ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले होते. गोतसभा ही प्राचीन काळच्या पूग, कुल यांसारखीच समर्थ व कार्यक्षम व्हावी हा महाराजांचा हेतू होता हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. एका गावचा पाटील गोतसभेला नको होता. छत्रपतींनी सभेचा निर्णय मान्य करून त्या पाटलाला गावावर