पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

लवकरच तडे जाऊन समाज दुबळा होतो व ज्या दुसऱ्या समूहांनी अशी अभंग एकात्मता साधली असेल त्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो.
 गेली शंभरदीडशे वर्षे अखिल भारताचे एक राष्ट्र घडविण्याचे येथील थोर समाजनेत्यांचे अखंड प्रयत्न चालू आहेत. त्यांना बरेचसे यशही लाभले आहे, भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले ते या प्रयत्नांचेच फळ आहे. पण त्याच वेळी मुस्लिम समाज हा भारताशी एकात्म न होऊ शकल्यामुळे पाकिस्तान निर्माण होऊन भारत हे राष्ट्र खंडित झाले. पण हे दुर्देव येथेच संपले नाही. आज दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ हे प्रदेश भारतापासून फुटून निघू पहात आहेत. काश्मीर, आसाम यांची हीच वृत्ती आहे. शिवाय आपापल्या प्रदेशापासून फुटून निघून सवता सुभा स्थापावा अशी गोवा, विदर्भ, सौराष्ट्र या भूविभागांची आणि जातीय मुस्लिम, नागा मिझोसारखे ख्रिश्चन समूह, तारासिंगांचे शीख अनुयायी यांची वृत्ती आहे. आमची संस्कृती भिन्न आहे, या भारतीय राष्ट्रात तिची गळचेपी होत आहे, आम्ही असेच येथे राहिलो तर ती समूळ नष्ट होऊन जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा वेळी मानवसमूह पृथक कशाने होतात, त्यांची संस्कृती भिन्न असते म्हणजे काय, भिन्न संस्कृतीची जाणीव केवळ आभास असतो की, ती सत्य असते, अशी ती असली तर तिच्या रक्षणार्थं स्वतंत्र सत्ता, स्वतंत्र शासन असणे आवश्यक असते की काय, या प्रश्नांचा खोलवर विचार होणे आवश्यक आहे. भारतातील बंगाल, बिहार, आसाम, पंजाब, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या प्रदेशांना आपल्या पृथगहंकाराची जाणीव दीर्घकाळापासून आहे. या प्रदेशांतील पंडितांनी आपापल्या प्रदेशांचे राष्ट्राचे - इतिहास लिहून ती दृढही केलेली आहे. भाषावार प्रांतरचना होऊन प्रादेशिक राज्ये झाल्यापासून या इतिहासलेखनाला पुन्हा उत्तेजन मिळून या पृथगात्मतेचे म्हणजेच आपापल्या पृथक संस्कृतीचे जे वैभव त्याचे गुणगान करावे अशी प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. या प्रवृत्तीत आक्षेपार्ह असे काहीच नाही. ती स्वागतार्हच आहे. भारताचे वैभव हे या सर्व राज्यांचे वैभव आहे. तेव्हा या वैभवात आपला अंशभाग किती, भारताच्या संस्कृतिसंवर्धनाचे आपल्या प्रदेशाला श्रेय किती हे सांगून त्याचा योग्य तो अभिमान प्रदेशराज्यांनी वाहिला तर ते श्लाध्यच आहे. पण तसे करताना आपण भारत राष्ट्राचे एक घटक आहोत या सत्याकडे कधीच दुर्लक्ष होता कामा नये. नाहीतर आधीच शिथिल होत चाललेल्या अखिल भारतनिष्ठेची हानी होईल. आपापले इतिहास लिहिताना सत्यापलाप करावा, सत्याला मुरड घालावी, काही सत्य झाकून ठेवावे असा याचा अर्थ नाही. मागल्या काळी या देशात भिन्न भाषिकांचे, वर्णांचे, वंशांचे, जातींचे अगदी प्राणांतिक संघर्ष झाले आहेत. त्यांचे इतिहास बदलून लिहावे असेही नाही. पण आपापले पृथक वैभव वर्णीत असताना आपणांला सर्वांना भारतनिष्ठा जोपासावयाची आहे याचा विसर पडू देणे इष्ट नव्हे, याबद्दल दुमत होईल असे वाटत नाही.